बांबू आहे एक पौष्टिक आहार! | पुढारी

बांबू आहे एक पौष्टिक आहार!

नवी दिल्ली : आपल्या देशात बांबूला ‘हिरवे सोने’ असेही म्हटले जाते. याचे कारण बांबू टिकाऊ आणि बहुपयोगी असतो. बांबू हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे. मात्र, अनेकांना ठाऊक नसते की बांबूचा वापर केवळ बांधकामासाठीच होतो असे नाही. ही वनस्पती एक औषधी आणि खाद्यही आहे. बांबू हा एक पौष्टिक आहार आहे!

गवताच्या कुळातील बांबू ही वेगाने वाढणारी सर्वात उंच वनस्पती आहे. ती ग्रामिनीई (पोएसी) कुळातील सदस्य आहे. बांबू हा विशेषतः बम्बूसी कुळातील असून तिच्यामध्ये 115 पेक्षाही अधिक वंश आणि 1400 प्रजाती समाविष्ट आहेत. भारतात आढळणारा बांबू सुमारे 12 मीटर उंचीपर्यंत वाढतो. आपल्या देशात बांबू विशेषतः ईशान्येकडील राज्ये, बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. चीननंतर भारत हाच जगातील दुसरा सर्वात मोठा बांबू उत्पादक देश आहे.

बांबूच्या शूटस्चा वापर भोजनाच्या रूपात आणि अनेक पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. प्राचीन काळापासूनच बांबूच्या कोंबाचा वापर खाद्यपदार्थांमध्ये होत आलेला आहे. भाजी, लोणचे, सॅलेड, नूडल्स, कँडी आणि पापडासहीत अनेक प्रकारचे पदार्थ बनवण्यासाठी बांबूचा वापर होतो. 100 ग्रॅम बांबू शूटस्मध्ये केवळ 20 कॅलरी, 3-4 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 2.5 ग्रॅम साखर, 0.49 ग्रॅम फॅट, 6 ते 8 ग्रॅम फायबर आढळते. याशिवाय ‘अ’, ‘ई’, ‘बी’, ‘बी 6’ अशी जीवनसत्त्वे, थायमिन, रायबोफ्लेविन, नियासिन, फोलेट आणि पँटोथेनिकही त्यामध्ये असते. तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम व आयर्नचेही चांगले प्रमाण बांबूमध्ये असते.

Back to top button