Ban on clothes : अजब… ‘या’ गावात कपडे घालण्यावर बंदी! | पुढारी

Ban on clothes : अजब... ‘या’ गावात कपडे घालण्यावर बंदी!

लंडन : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा आहेत. यापैकी कोणत्याही एका वस्तूखेरीज सुखी आयुष्याची कल्पना करणे जवळपास अशक्य आहे. मानवी उत्क्रांती होण्याआधी मानव अन्य प्राण्यांप्रमाणे नग्न फिरत होता. यानंतर ऊन, वारा, थंडी यापासून बचाव करण्यासाठी मानव झाडांची पाने शरीरावर बांधू लागला. पाठोपाठ नवनवे बदल होत गेले आणि आता तर पोशाख (Ban on clothes) हीच मानवाची ओळख बनली आहे. वेगवेगळ्या परंपरेनुसार माणसे वस्त्रे परिधान करत आहेत. तथापि, आजही अनेक जमातींमधील लोक अर्धनग्न अवस्थेत राहतात. यापेक्षाही अजब गोष्ट म्हणजे या पृथ्वीतलावावर असे एक गाव असे जिथे कपडे घालण्यास चक्क बंदी आहे. या गावातील स्त्री-पुरुष सारेच विवस्त्र फिरतात. यामागचे कारण आहे निसर्गाशी जवळीक. संपूर्ण जगात मानव हा एकमेव प्राणी आहे जो वस्त्र परिधान करतो. यामुळेच कोणत्याही देशाच्या पेहरावाचा थेट संबंध तिथल्या संस्कृतीशी असतो. पृथ्वीवर मनुष्याच्या अशा अनेक जमाती आहेत ज्या वस्त्रे परिधान करत नाहीत. अनेक आदिवासी समाज अंगावर कपडे चढवत नाहीत. एवढेच नव्हे तर ते स्वतःला मुख्य प्रवाहापासून दूर ठेवतात.

ब्रिटनमध्ये स्पीलप्लात्ज नावाचे गाव आहे. या गावातील लोक अधिक शिक्षित आणि प्रगतशील विचारांचे आहेत, असे मानले जाते. मात्र, या गावाने स्वतःला मूळ प्रवाहापासून तोडलेले नाही. जवळपास 94 वर्षांपासून या गावातील लोकांनी कपड्यांशिवाय राहणे पसंत केले आहे. हे गाव हर्टफोर्डशायरमधील ब्रिकेटवुडजवळ आहे. या गावात स्त्री आणि पुरुष दोघांनाही कपडे (Ban on clothes) न घालता रहावे लागते. विशेष म्हणजे या गावात येणार्‍या पर्यटकांनाही विवस्त्रच फिरावे लागते. गावातील लोकांची जीवनशैली अतिशय प्रगत आहे. तेथील जवळपास सर्वांकडे स्वतःचे पब, स्विमिंग पूल आणि इतर अनेक सुविधा आहेत. तरीही या गावात कपडे घालण्यास मनाई आहे. हुडहुडी भरवणार्‍या थंडीतच तेथे लोकांना कपडे घालण्याची परवानगी दिली जाते.

कपड्यांवर का आहे बंदी?

स्वतःला निसर्गमित्र म्हणवणार्‍या इस्ल्ट रिचर्डसन यांनी हे गाव वसवले. निसर्गाच्या सहवासात राहण्यासाठी या गावाची निर्मिती त्यांनी केली. यामुळेच या गावाची जीवनशैली सर्वस्वी वेगळी असल्याचे पाहायला मिळते. गावातील लोक स्वतःला निसर्गाचे पूजक मानतात. म्हणूनच तिथे कपडे न परिधान करण्याचा नियम करण्यात आला. सुरुवातीला या संकल्पनेला तीव्र विरोध झाला. तथापि, रिचर्डसन यांनी असा नियम करण्यामागचे महत्त्व आणि आपली भूमिका टीकाकारांना पटवून दिली. नंतर तिथे कपडे न घालण्याच्या नियमाला मान्यता देण्यात आली. (Ban on clothes) आपल्या भारताबद्दल सांगायचे तर अंदमान बेटावर राहणारी ‘जारवा’ आदिवासी जमातही कोणत्याही प्रकारचे वस्त्रे परिधान करत नाही. या जमातीने आजदेखील आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे.

Back to top button