लांडग्यासारखे दिसण्यासाठी त्याने खर्च केले 18 लाख रुपये | पुढारी

लांडग्यासारखे दिसण्यासाठी त्याने खर्च केले 18 लाख रुपये

टोकियो : सर्वसाधारणपणे लोक लांडग्याला बघून दूर पळतात. मात्र, जपानमधील या अवलियाची बातच निराळी. या माणसाने लांडग्यासारखे दिसण्यासाठी 18 लाखांचा खर्च करत हुबेहूब तसा पोशाखच बनवून घेतला. याला जणू लांडगा बनण्याचे वेड लागले असावे. त्याचे फोटो सोशल मीडियावर भन्नाट व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, या माणसाने आपली ओळख उघड केलेली नाही. या व्यक्तीने आपला पोशाख कसा परिधान करायचा आणि त्याची किंमत याबद्दल माहिती दिली आहे.

एका कंपनीकडून त्याने हा लांडग्यासारखा पेहराव बनवून घेतला आहे. जेव्हा त्याने हा अनोखा पोशाख अंगावर चढवला तेव्हा लोकांना क्षणभर खरोखरचा लांडगा आपल्यासमोर प्रकट झाल्याचा भास झाला. या व्यक्तीलासुद्धा स्वतःचे हे लांडग्यासारखे रूप पाहून धक्का बसला. काही दिवसांपूर्वी याच व्यक्तीने कुत्र्यासारखा पोशाख घातला होता. त्याचे त्या वेशातले फोटोही सोशल मीडियावर चर्चेत होते. त्याचे म्हणणे आहे की, त्याला लहानपणापासूनच प्राण्यांची खूप आवड होती आणि त्याला टीव्हीवर दाखवलेल्या काही प्राण्यांचे पोशाख आवडायचे. म्हणूनच त्याला त्यांच्यासारखे दिसायला आवडते.

Back to top button