जास्त वेळ बसून राहणे ठरते धोकादायक | पुढारी

जास्त वेळ बसून राहणे ठरते धोकादायक

नवी दिल्ली ः उभे राहणे किंवा फिरणे यापेक्षा बसण्यासाठी कमी ऊर्जा लागते. प्रदीर्घ काळ कॉम्प्युटर आणि लॅपटॉपवर काम केल्यामुळे अनेकांना शारीरिक समस्या जाणवू लागल्या आहेत. त्यामध्ये लठ्ठपणा आणि मेटॅबॉलिझम सिंड्रोम, हाय ब्लड प्रेशर, ब्लड शुगर, कमरेभोवती अतिरिक्त चरबी आणि हाय कोलेस्टेरॉल यांचा समावेश होतो. एकंदरीत जास्त काळ बसून काम केल्यास हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग आणि कर्करोगाचा धोका वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

कामं आणि बसण्याची वेळ या बाबतीत संशोधकांनी सुमारे 13 पेपर्सचा अभ्यास केला आहे. त्यांनी शोधून काढलं की, ज्या व्यक्ती दिवसातून आठ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसतात, त्यांना जास्त वजन आणि धूम्रपान होणार्‍या मृत्यूइतकाच धोका असतो. म्हणजेच जास्त काळ एकाच जागी बसल्याने मृत्यूचा धोका वाढू शकतो. एक दशलक्षहून अधिक व्यक्तींच्या माहितीच्या आधारे केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे, की दररोज 60 ते 75 मिनिटांचा मध्यम किंवा तीव— स्वरूपाचा शारीरिक व्यायाम केल्यास जास्त काळ बसण्याच्या नकारात्मक परिणामांचा सामना करता येऊ शकतो. ‘ज्या व्यक्ती जास्त काळ सक्रिय असतात त्यांना सतत बसलेल्या व्यक्तींच्या तुलनेत मृत्यूचा धोका कमी असतो,’ अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. एकंदरीत, जास्त वेळ बसून काम केल्याने हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग आणि कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका वाढलेला दिसतो. याउलट जास्त हालचाल केल्यास आरोग्य चांगले राहते.

 

Back to top button