Expensive pineapple : जगातील सर्वात महागडे अननस | पुढारी

Expensive pineapple : जगातील सर्वात महागडे अननस

लंडन : जगात फळांच्याही अनेक महागड्या प्रजाती आहेत. त्यामध्ये रूबी रोमन ग्रेप्स (लाल द्राक्षे), यूब्री मेलन (कलिंगड) यांच्यासारख्या काही फळांचा समावेश होतो. इंग्लंडमधील विशिष्ट अननसही (Expensive pineapple) असेच महागडे आहे. त्याची किंमत तब्बल 1 लाख रुपये आहे.

अननसमध्ये मुबलक प्रमाणात पोषक तत्त्व आढळतात. भारतात आसाम,त्रिपुरा, मेघालय, केरळ, बंगाल आणि महाराष्ट्रात अननसाची (Expensive pineapple) लागवड केली जाते. या पिकासाठी 20 ते 30 अंश तापमान आणि हवामानात आर्द्रता असावी लागते. अननसाचे औषधी गुणधर्मही आहेत. अननसात व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंटस् तसेच मँगेनीज आणि पोटॅशियमसारखी खनिजे असतात. विशेषत: हिवाळ्यात हे फळ आरोग्यासाठी उत्तम आहे. अननस खाल्ल्याने जास्त भूक लागते, ताप असताना खाल्ल्यास ताप कमी होतो. लघवीतील जळजळ कमी होते.

तसेच हाडे मजबूत करण्यास मदत करते. ‘हेलिगन’ अननस हे इंग्लंडमधील कॉर्नवॉलमध्ये उत्पादित होते. या एका अननसाची किंमत सुमारे 1,000 पौंड स्टर्लिंग (1 लाख रुपये) आहे. एक पीक तयार होण्यासाठी सुमारे दोन ते तीन वर्षे लागतात. एका वेबसाईटनुसार, अननस 1819 मध्ये ब्रिटनमध्ये आणले गेले होते. लवकरच बागायतदारांच्या लक्षात आले की, देशातील हवामान अननस (Expensive pineapple) लागवडीसाठी चांगले नाही. म्हणून, त्यांना एक कल्पना सूचली.

विशेष अशी खड्ड्याच्या आकाराची लाकडी भांडी तयार करून आणि कुजलेल्या खताचा पुरवठा करून अननसाचे (Expensive pineapple) उत्पादन घेणे सुरू करण्यात आले. त्याला एक बॅकअप हिटर जोडून हवामान पूरक करण्यात आले. उष्णतेमुळे हवा गरम होते जी भिंतीतील छिद्रांद्वारे खड्ड्यांमध्ये प्रवेश करते. रिपोर्टनुसार, हेलिगनच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘अननस खूप मेहनतीने पिकवले जातात. अननसाची काळजी घेण्यासाठी लागणारा वेळ, खत, वाहतूक खर्च, अननसाची देखभालीमुळे प्रत्येक अननसाची किंमत आम्हाला 1,000 पौंड पडते.’ या फळाचा लिलाव झाल्यास प्रत्येक अननसाची किंमत 10 लाखांपर्यंत असू शकते, असे उद्यान अधिकार्‍यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button