‘हबल’ने टिपला दोन आकाशगंगांचा ‘संगम’ | पुढारी

‘हबल’ने टिपला दोन आकाशगंगांचा ‘संगम’

वॉशिंग्टन : हबल स्पेस टेलिस्कोपने आता दोन आकाशगंगांच्या जणू काही संगमाचे द़ृश्य टिपून घेतले आहे. या दोन्ही आकाशगंगांच्या अतिशय तीव्र अशा गुरुत्वाकर्षण बळामुळे निर्माण झालेल्या तार्‍यांच्या चमकदार वर्तुळाचे द़ृश्यही यामधून दिसून येत आहे.

या दोन्ही आकाशगंगांना एकत्रितपणे ‘आर्प-मॅडोर 417-391’ असे म्हटले जाते. एकमेकींना धडकून परस्परांमध्ये विलय पावत असलेल्या या आकाशगंगा पृथ्वीपासून 670 दशलक्ष प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. या आकाशगंगांचे नवे छायाचित्र ‘हबल’च्या अद्ययावत अशा ‘कॅमेरा फॉर सर्व्हेज’ (एसीएस) ने टिपले आहे. ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या काळातील आकाशगंगा टिपण्यासाठीच हा कॅमेरा विशेषत्वाने विकसित करण्यात आलेला आहे.

युरोपियन स्पेस एजन्सीने अलीकडेच म्हणजेच 21 नोव्हेंबरला रीलिज केला होता. या संस्थेने म्हटले आहे की या दोन आकाशगंगा त्यांच्या तीव्र गुरुत्वाकर्षणामुळे एकमेकींकडे खेचल्या जाऊन धडकल्या व त्यांच्यामुळे तार्‍यांची एक कडीच बनलेली आहे. जून 2019 मध्येही हबल अंतराळ दुर्बिणीने दोन आकाशगंगांचे असेच मीलन होत असलेले द़ृश्य टिपले होते. त्यांना ‘आर्प-मॅडोर 2026-424’ असे नाव देण्यात आले आहे.

Back to top button