मधाच्या सेवनाने घटतो हृदयविकाराचा धोका | पुढारी

मधाच्या सेवनाने घटतो हृदयविकाराचा धोका

लंडन : जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगातील सुमारे 1.28 अब्ज लोकांना हायब्लड प्रेशर म्हणजेच उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. परंतु, दुर्दैवाने त्यापैकी 46 टक्के लोकांना हे माहीतच नाही की त्यांना बीपीचा आजार आहे. डब्ल्यूएचओच्या मते, हृदयविकारामुळे दरवर्षी सुमारे 1.79 कोटी लोकांचा मृत्यू होतो. आता कॅनडामध्ये झालेल्या एका रिसर्चनुसार मधाचं सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. म्हणजेच रोज काही चमचे मध खाल्ल्यास आपलं डॉक्टरकडे जाणं कमी होऊ शकतं. विशेष म्हणजे मधामध्ये 80 टक्के साखर असते, तरीही तो रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतो.

बि—टिश संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, कॅनडामध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे, की मध रक्तातील साखर संतुलित ठेवतो आणि कोलेस्टेरॉलचा स्तर वाढू देत नाही. या दोन्ही गोष्टी मेटाबॉलिक हेल्थसाठी म्हणजेच चयापचय क्रियेसाठी आवश्यक आहेत. ‘कार्डिओमेटाबॉलिक डिसिज’ हा जीवनशैलीशी संबंधित एक सामान्य आजार झाला आहे. त्यामुळे हार्टअटॅक, स्ट्रोक, मधुमेह, नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरसारखे आजार होतात. या आजारांना वेळीच रोखता येते. तज्ज्ञांच्या मते, योग्य जीवनशैलीनुसार आहारात साखरेऐवजी मधाचा वापर केल्यास ‘टाईप 2 डायबेटिस’, हृदयविकार आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज हे आजार टाळता येऊ शकतात.

युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोच्या संशोधकांनी कच्च्या मधावर एक अभ्यास केला, ज्यामध्ये 1800 लोकांचा समावेश होता. यामध्ये 18 चाचण्या झाल्या. मध खाणार्‍यांमध्ये ब्लड शुगर लेव्हल आणि बॅड कोलेस्टेरॉलची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली, तसेच चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढली, असे अभ्यासात आढळून आले. या ट्रायलमध्ये सहभागी सदस्यांनी हेल्दी डाएट घेतले आणि साखर फक्त 10 टक्के कमी केली. या व्यक्तींना दररोज सरासरी 40 ग्रॅम म्हणजेच दोन चमचे मध देण्यात आला होता. यांना 8 आठवडे रोज मधाचे सेवन करण्यास सांगितले होते.

Back to top button