छोटा, सोनेरी बेडूक घेऊ शकतो दहा माणसांचा जीव! | पुढारी

छोटा, सोनेरी बेडूक घेऊ शकतो दहा माणसांचा जीव!

वॉशिंग्टन : जगात केवळ सापच विषारी असतात असे नाही. प्राण्यांपासून वनस्पतींपर्यंत अनेक गोष्टी विषारी असू शकतात. त्यामध्येच एका विषारी बेडकाचाही समावेश आहे. हा बेडूक सकृतदर्शनी अत्यंत सुंदर दिसतो. छोटासा, सोनेरी पिवळ्या रंगाचा हा बेडूक वास्तवात मात्र जीवघेणाही ठरू शकतो. त्याच्यामध्ये इतके विष असते की तो एकावेळी दहा प्रौढ माणसांनाही मारू शकेल!

या बेडकाचे नाव आहे ‘गोल्डन पॉईझन फ्रॉग’ हे बेडूक दोन इंच उंचीचे असतात. कोलंबियातील शिकारी लोक या बेडकाच्या विषाचा वापर आपल्या बाणांच्या टोकांना लावण्यासाठी करतात. हा बेडूक इतका विषारी कसा बनतो याची अद्याप स्पष्ट माहिती नाही. मात्र, त्याचे विष वनस्पती व विषारी किड्यांमुळे बनते असे मानले जाते. हे बेडूक ज्या ठिकाणी आढळतात त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी असलेल्या बेडकांमध्ये विष नसते. हा बेडूक इतका विषारी असतो की त्याला केवळ स्पर्श केल्यावरही मृत्यू ओढवू शकतो.

हा बेडूक औषधे बनवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. त्याच्यापासून एक शक्तिशाली पेन किलर म्हणजेच वेदनाशामक औषध बनू शकते. या चमकदार बेडकांच्या शंभरपेक्षा अधिक प्रजाती आहेत. त्यांची सरासरी लांबी एक इंचापेक्षा थोडी अधिक असते. त्याच्या बहुतांश प्रजाती कोलंबियातील प्रशांत महासागराच्या तटावर असलेल्या वर्षावनातील एका छोट्या भागात आढळतात. हे बेडूक बहुतांशी पिवळ्या रंगाचेच असले तरी नारंगी व हलक्या हिरवट रंगाचेही असू शकतात. वेगवेगळ्या अधिवासाप्रमाणे हा रंग बदलतो.

Back to top button