रोज ठराविक वेळेत औषध घेणे ठरते लाभदायक | पुढारी

रोज ठराविक वेळेत औषध घेणे ठरते लाभदायक

लंडन : घड्याळ्याच्या काट्याबरोबर धावणे ही तर आता आपली दिनचर्याच बनलेली आहे. मात्र, आपल्या शरीरातही एक जैविक घड्याळ असते. झोपणे-जागणे, खाणे-पिणे, चालण्या-फिरण्याच्या सवयी आपल्या शरीराचे ‘बायोलॉजिकल क्लॉक’ सेट करतात. प्रत्येकाचे असे घड्याळ वेगळे असते. रुग्णाचे हे घड्याळ समजून घेत आजारावर उपचार केल्यास तो लवकर बरा होतो, असे नव्या संशोधनात आढळले. डॉक्टर याला क्रोनोफार्माकोलॉजी किंवा सर्केडियन र्‍हिदम्स (स्पंदन निर्माण करणारी लय) म्हणतात. रोज विशिष्ट वेळीच औषधे घेण्याच्या सवयीने लाभ मिळतो असे त्यामधून दिसून आले आहे.

24 तासांत एखाद्या व्यक्तीत नियमितपणे होणार्‍या शारीरिक, मानसिक व व्यावहारिक बदलांनी लय निश्चित होते. तसेच प्रकाश व अंधारावर प्रतिक्रिया देते. माणसांतच नाही तर प्राणी, झाडे आणि सूक्ष्मजीवांतही सर्केडियन र्‍हिदम्स असतात. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक डेविड रे दम्याचे रुग्ण आहेत. ते एका विशिष्ट वेळी इनहेलर घेतात. त्यांच्या शरीराने ही वेळ जाणली आहे. इनहेलर या वेळेत सर्वाधिक प्रभावी ठरते. ते म्हणतात, रुग्णाला डॉक्टर सकाळ-सायंकाळ किंवा दुपारी औषध घेण्यास सांगतात.

ते ठराविक वेळ सांगत नाहीत. मात्र, रुग्ण हे औषध नियमितपणे एकाचवेळी घेत असेल तर त्याचे शरीर ती औषधी वेगाने स्वीकारते. सकाळी दिलेली कोरोनाची लस जास्त परिणामकारक असल्याचे गेल्यावर्षी चीनमधील एका संशोधनात आरोग्य कर्मचार्‍यांना आढळले. तथापि, सायंकाळी दिलेली कोरोना लस अधिक प्रभावी असल्याचे यावर्षी ब्रिटनमध्ये झालेल्या संशोधनात आढळले. वस्तुत: आपले हार्मोन्स, इम्यून सेल्स आणि अवयवांचे कार्य दिवसभर बदलत राहते. इतकेच नाही तर आपल्या शरीराचे तापमानही बदलते.

Back to top button