माया संस्कृतीमधील शंभर बळींचा शोध | पुढारी

माया संस्कृतीमधील शंभर बळींचा शोध

न्यूयॉर्क : पंधरा वर्षांपूर्वी मध्य अमेरिकेतील देश असलेल्या बेलिझमध्ये एक गुहा सापडली होती. या निबिड अंधःकार असलेल्या गुहेला ‘मिडनाईट टेरर केव्ह’ असे नाव देण्यात आले होते. याच गुहेत आता प्राचीन माया संस्कृतीच्या काळात शंभरपेक्षा अधिक लोकांचा पर्जन्यदेवतेला बळी देण्यात आला होता असे आढळले आहे. एक हजार वर्षांपूर्वी बळी दिलेल्या या लोकांचे अवशेष आढळून आले आहेत.

इसवी सन 250 ते 925 या काळाला माया संस्कृतीचा महत्त्वाचा काळ मानला जातो. ही दफनभूमी याच काळातील आहे. 2006 मध्ये एका जखमी लुटारूला वाचवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या स्थानिक लोकांनी या गुहेचे नामकरण केले होते. लॉस एंजिल्सच्या कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी या गुहेत तीन वर्षे उत्खनन केले.

तिथे एकूण 118 लोकांची दहा हजारांपेक्षाही अधिक हाडे आढळून आली. बहुतांश लोकांना मृत्यूवेळी मोठ्या संकटाच्या भयावह अनुभवातून जावे लागले होते असेही दिसून आले. त्यांच्या दातांवरील कॅल्सिफाईड प्लाकचाही अभ्यास करण्यात आला. या संशोधनाची माहिती ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑस्टियोआर्कियोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये म्हटले आहे की किमान दोन बळींच्या दातांवर गूढ अशा निळ्या रेषा दिसून आल्या. विशेष म्हणजे माया संस्कृतीमधील विधींमध्ये निळ्या रंगाला अधिक महत्त्व होते.

Back to top button