अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठ्या झाडाचा शोध | पुढारी

अ‍ॅमेझॉनमध्ये सर्वात मोठ्या झाडाचा शोध

ब्रासिलिया : जगातील मोठ्या अ‍ॅमेझॉन जंगलात सर्वात मोठ्या झाडाचा शोध लावण्यात आला आहे. यासाठी तब्बल तीन वर्षांची योजना, चारवेळा अपयशी प्रयत्न व दोन आठवड्यांच्या पायी प्रवासानंतर 19 जणांच्या पथकाने हे झाड शोधण्यात यश मिळविले.

अ‍ॅमेझॉन जंगलातील सर्वात मोठे अशी बिरुदावली मिळालेले हे झाड तब्बल 290 फूट उंच म्हणजे सुमारे 25 मजली इमारती इतके, तसेच ते 32 फूट रुंद आहे. हे अद्भुत झाड ‘एंजेलिम वर्मेल्हो’ प्रजातीचे आहे. याचे शास्त्रीय नाव ‘डिनीजिया एक्सकेल्सा’ असे आहे. गेल्या 12 ते 25 सप्टेंबर यादरम्यान आखण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान 19 जणांच्या पथकाने या झाडाचा शोध लावला. उल्लेखनीय म्हणजे या झाडाला शोधण्यासाठी पथकाने नावेतून तब्बल 250 किमीचा तर पायी 20 किमीचा पायी पर्वतीय प्रवास केला.

शास्त्रज्ञांच्या मते, हे झाड 400 ते 600 वर्षांचे आहे. जगातील सर्वात मोठ्या अ‍ॅमेझॉन जंगलातील सर्वात मोठ्या झाडाला 2019 मध्ये उपग्रहीय फोटोमध्ये पाहण्यात आले होते. त्यावेळी शास्त्रज्ञ 3-डी मॅपिंगच्या मदतीने झाड शोधण्याची तयारी करत होते. त्यानंतर संशोधक, शिक्षणतज्ज्ञ, आणि स्थानिक गाईडस यांनी हे झाड शोधण्यासाठी 10 दिवसांचा प्रवास केला. पण प्रवासादरम्यान पथकातील अनेक लोक आजारी पडल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. अशा चारवेळच्या अपयशानंतर एकदाचे सर्वात मोठे झाड सापडले.

दरम्यान एंजेलिम वर्मेल्होचे लाकूड फारच महागडे असल्याने या मोठ्या वनपरिसरावर वृक्षतोडीचे संकट उभे आहे. गेल्या काही वर्षांत अ‍ॅमेझॉनमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने या जंगलाचे अस्तित्व धोक्यात सापडले आहे.

Back to top button