नऊ वर्षांनी हजार मैलांवर सापडले हरवलेले मांजर | पुढारी

नऊ वर्षांनी हजार मैलांवर सापडले हरवलेले मांजर

कॅलिफोर्निया : पाळलेल्या प्राण्यांवर बहुतेक लोक जीवापाड प्रेम करतात. अशावेळी आपला पाळीव प्राणी हरवला तर दु:ख होते. प्रचंड शोध घेऊनही हरवलेला जीव सापडला नाही, तर दु:खाने मनाची तयारी करावी लागते. याबाबतीत एक अमेरिकन महिला नशिबनवान ठरली. तिचे एक मांजर हरवलेल्या 9 वर्षांनी आणि तब्बल एक हजार मैल अंतरावर सापडले.

कॅलिफोर्निया येथे राहणार्‍या एका महिलेचे मांजर 9 वर्षांपूर्वी बेपत्ता झाले होते. या मांजराचा तिने प्रचंड शोध घेतला, पण तिच्या पदरी निराशाच पडली; मात्र अचानक तिला समजले की, आपले हरवलेले मांजर एक हजार मैल अंतरावर राहणार्‍या एका महिलेजवळ आहे. यामुळे कॅलिफोर्नियातील महिलेच्या आनंदाला पारावर राहिला नाही.

कॅलिफोर्नियातील क्लोविस कौंटीत राहणार्‍या सुसैन मोरे या महिलेला एक कॉल आला आणि तिला आपले हरवलेले हॅरिएट (मांजराचे नाव) जिवंत असल्याचे समजले. यासंदर्भात सुसैनने सांगितले की, मी इहाडो प्रांतात राहणार्‍या एका महिलेला फोन केला. बोलता बोलता नऊ वर्षांपूर्वी हरवलेल्या हॅरिएटबद्दल सांगितले. मात्र, हॅरिएट नामक हे मांजर आपल्याजवळ सुरक्षित असल्याचे इहाडो प्रांतातील महिलेने सांगितले. हे मांजर तिने 3 वर्षांपूर्वी शेल्टर होममधून आणले होते. दरम्यान, सुसैनला मांजर परत मिळण्याची शक्यता कमीच असली तरी एकेकाळी आपण पाळलेला जीव जिवंत आणि सुरक्षित असल्याचे पाहून तिला फारच आनंद झाला.

Back to top button