एकोणीस वर्षांची तरुणी करते ग्लॅमर जगताविषयीची भविष्यवाणी | पुढारी

एकोणीस वर्षांची तरुणी करते ग्लॅमर जगताविषयीची भविष्यवाणी

न्यूयॉर्क : नॉस्त्रेदेमसपासून बाबा वेंगापर्यंत अनेक भविष्यवेत्त्यांच्या भविष्यवाणी जगभर प्रसिद्ध आहेत. बल्गेरियात जन्मलेल्या बाबा वेंगाच्या भाकितांची अनेक वेळा चर्चा होत असते. आता 19 वर्षांच्या तरुणीला सध्याच्या काळातील ‘बाबा वेंगा’ म्हटले जात आहे. हॅना कॅरोल असे तिचे नाव. ती प्रामुख्याने पॉप, चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांबाबतच भविष्यवाणी करते. तिने 2022 या वर्षासाठी 28 मोठ्या भविष्यवाण्या केल्या होत्या. त्यापैकी दहा भविष्यवाण्या आतापर्यंत खर्‍या ठरल्याचे सांगितले जाते.

अमेरिकेतील मॅसाच्युसेटस् येथे राहणारी हॅना केवळ 19 वर्षांची असली तरी तिच्या या भविष्यवाण्यांमुळे ती नेहमीच चर्चेत असते. हॅनाने 2022 च्या सुरुवातीलाच महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूची भविष्यवाणी केली होती, जी खरी ठरली आहे. या वर्षाच्या जानेवारीमध्ये हॅनाच्या भविष्यवाण्यांमध्ये किम कर्दाशियनचा ब्रेकअप, हॅरी स्टाईल्स आणि बियॉन्सचा नवीन अल्बम, रिहाना आणि प्रियांका चोप्रा यांच्या आई बनण्याविषयीच्या भविष्यवाण्यांचा समावेश होतो. तिच्या बहुतेक भविष्यवाण्या पॉप कल्चर आणि सिनेमा इंडस्ट्रीशी संबंधित आहेत.

2022 च्या भविष्यवाणीच्या यादीत केंडल जेनरचा साखरपुडा, हेली बीबरचे गर्भवती असणे, टायलर स्विफ्टच्या लग्न किंवा साखरपुड्याची घोषणा, वन डायरेक्शन बँडचे पुनर्मिलन यांचा समावेश आहे. हॅना म्हणते की तिला पॉप कल्चर आणि सिनेइंडस्ट्रीत अधिक रस आहे. त्यामुळे तिच्या बहुतेक भविष्यवाण्या या क्षेत्राशीच संबंधित असतात.

Back to top button