चीनच्या आकाशात दिसले विचित्र इंद्रधनुष्य | पुढारी

चीनच्या आकाशात दिसले विचित्र इंद्रधनुष्य

बीजिंग : पावसाच्या थेंबामधून सूर्यकिरणे गेली की इंद्रधनुष्य प्रकट होत असते. श्रावण-भाद्रपदाच्या निसर्गचित्रात असे सप्‍तरंगी इंद्रधनुष्य हटकून असतेच. काही वेळा दोन इंद्रधनुष्यही दिसून येत असतात. चीनमध्ये मात्र ढगांवर एक अनोखेच इंद्रधनुष्य दिसले. चेनच्या हायको शहरात ज्यावेळी लोकांनी हे अनोखे द‍ृश्य पाहिले त्यावेळी ते थक्‍कच झाले. हे रंगीबेरंगी द‍ृश्य होते, पण ते ढगाच्या आकाराचे, गोलाकार होते. त्याचा व्हिडीओ तत्काळ व्हायरल झाला. हे इंद्रधनुष्य म्हणजे खरे तर एक ढगच होता ज्यावर जो अशा रंगीत प्रकाशाने उजळून गेला होता.

हे अनोखे द‍ृश्य 21 ऑगस्टला 20 लाख लोकसंख्या असलेल्या हायको शहराच्या आसमंतात दिसले. ही घटना ‘पिलीयस क्लाऊड’ या नावाने ओळखली जाते. ‘द वेदर नेटवर्क’नुसार हवेतील आर्द्रता आणि संघननाच्या कारणामुळे हे ढग असे दिसतात. हे सुंदर द‍ृश्य बनण्यामागे अर्थातच सूर्यकिरणांची महत्त्वाची भूमिका असते. ढगांमधील थेंबांमध्ये ज्यावेळी योग्य कोनात सूर्यकिरणे पडतात त्यावेळी असे इंद्रधनुष्यासारखे रंग ढगामध्ये दिसतात.

सूर्यापासून ज्यावेळी प्रकाश पृथ्वीपर्यंत येतो त्यावेळी तो सफेदच असतो. मात्र तो एखाद्या प्रिझम किंवा लोलकातून सोडला तर वेगवेगळे रंग दिसून येतात. अशीच क्रिया इंद्रधनुष्याबाबत नैसर्गिकरीत्या घडत असते. फ्रेंच संशोधक रेने डेकार्ट यांनी सर्वप्रथम याचा शोध लावला होता. आयझॅक न्यूटनच्या संशोधनापूर्वी पाश्‍चात्य देशात असे मानले जात होते की इंद्रधनुष्यात पाच रंगच असतात. मात्र सन 1666 मध्ये न्यूटनने सांगितले की यामध्ये जांभळा आणि नारंगी रंगही असतो.

Back to top button