अब्जावधी वर्षांपासून सूर्य कसा काय धगधगतोय? | पुढारी

अब्जावधी वर्षांपासून सूर्य कसा काय धगधगतोय?

वॉशिंग्टन : पृथ्वीवर जीवन अस्तित्वात येण्यासाठी तसेच ते टिकवून ठेवण्यात ‘सूर्य’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सूर्य हा पृथ्वीवरील ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीला प्रकाश पुरवत असलेल्या सूर्याचे काम तरी कसे चालते? तसेच या आगीच्या गोळ्याची आग कशी काय संपत नाही? खगोल शास्त्रज्ञांच्या मते, अजून अब्जावधी वर्षे सूर्य तळपत राहून पृथ्वीला प्रकाशमान व ऊर्जा प्रदान करत राहील.

विज्ञानाच्या द‍ृष्टीने पाहिल्यास सूर्य हा सुमारे 4.5 अब्ज वर्षांचा प्राचीन तारा आहे. त्याच्यात मोठ्या प्रमाणात हेलियम आणि हायड्रोजन हे वायू आहेत. तसेच प्रचंड भारमानामुळे सूर्य हा हेलियम व हायड्रोजनला आपल्यातच रोखून धरतो आणि मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पासारखे काम करतो.

आपल्या सूर्याच्या तुलनेत ब्रह्मांडातील दुसरे तारे पृथ्वीपासून अनेक प्रकाशवर्षे दूर अंतरावर आहेत. या मानाने आपल्या आकाशमालेतील सूर्य हा पृथ्वीपासून अगदी जवळ आहे. यामुळे सूर्याची किरणे अवघ्या आठ मिनिटे आणि काही सेकंदात पृथ्वीवर येऊन पोहोचतात. यामुळेच तापमान आणि उत्सर्जित प्रकाशाची मात्रा, या आधारे शास्त्रज्ञांनी सूर्याला ‘जी 2’ या श्रेणीत स्थान दिले आहे.

सूर्याच्या मध्य भागातील 25 टक्के भागाला क्रोड असे म्हणतात. तर 30 टक्के बाह्य भागाला कनेक्टिव्ह झोन असे म्हटले जाते. याशिवाय उर्वरित 35 टक्के भागाला रेडिओ अ‍ॅक्टिव झोन म्हणून ओळखले जाते. मात्र, सूर्याच्या क्रोड या भागातच सूर्याच्या प्रचंड ऊर्जा स्रोताचे रहस्य दडले आहे. याचे संशोधन सुरू आहे.

Back to top button