‘जेम्स वेब’ने टिपल्या गुरूच्या प्रतिमा | पुढारी

‘जेम्स वेब’ने टिपल्या गुरूच्या प्रतिमा

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने गुरू ग्रहाच्या नव्या प्रतिमा टिपल्या आहेत. यापूर्वीही जेम्स वेबने ब्रह्मांडाच्या तसेच गुरू व अन्य ग्रहांच्याही अनेक प्रतिमा टिपलेल्या आहेत. गुरूच्या नव्या प्रतिमा इतक्या सुस्पष्ट आहेत की त्यामध्ये गुरूचे काही चंद्र, कडी, गुरूवरील वादळाचा लाल ठिपका तसेच उत्तर व दक्षिण ध्रुवावरील ऑरोराही दिसून येतो.

पहिल्या फोटोत ऑरोरा आणि अधिक उंचीवरील धुक्याला लाल रंगाने दर्शवलेले आहे. ढगांच्या दाट स्तरांना पिवळ्या आणि हिरव्या रंगात दर्शवले आहे. गुरूवरील सर्वात दाट हिस्सा निळ्या रंगाचा दिसतो. ग्रहावरील सफेद डाग म्हणजे खरे तर गुरूवरील ‘ग्रेट रेड स्पॉट’ या नावाने ओळखला जाणारा तांबूस ठिपका आहे. हा लाल ठिपका तेथे अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या भयावह वादळाचा आहे. या छायाचित्रात तो सूर्यप्रकाशामुळे सफेद दर्शवलेला आहे.

अन्य फोटोंमध्ये गुरूबरोबर त्याचे चंद्र लो, अमालथिया आणि एड्रासटिया हे दिसून येतात. तसेच गुरूची शनीसारखी दिसणारी, पण विरळ अशी कडीही दिसते. अंतराळाच्या काळोखातील छोटे छोटे सफेद बिंदू म्हणजे अन्य आकाशगंगा आहेत. गुरूची ही छायाचित्रे 27 जुलैला टिपण्यात आली होती. त्यांना आता इमेज प्रोसेसिंगद्वारे सुंदर व रंगीत बनवून ‘नासा’ने प्रसिद्ध केले आहेत.

Back to top button