सप्टेंबरमध्ये ‘नासा’चे यान धडकणार लघुग्रहावर | पुढारी

सप्टेंबरमध्ये ‘नासा’चे यान धडकणार लघुग्रहावर

ह्यूस्टन : प्रत्येक महिन्यात एक-दोन लघुग्रह पृथ्वीजवळून जात असल्याच्या बातम्या येत असतात.हे लघुग्रह कधी पृथ्वीजवळून अथवा दीर्घअंतरावरून जात असतात. मात्र, एखादा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येत आहे आणि त्याच्या दिशेत बदल होत नसेल तर तो पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असते. अशा धोकादायक लघुग्रहांची दिशा बदलून पृथ्वीचे संरक्षण करण्याच्या द़ृष्टीने अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने गतसाली ‘डार्ट मिशन’ लाँच केले होते. येत्या 26 सप्टेंबर रोजी हे मिशन लघुग्रहावर धडकवून त्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

पृथ्वीला लघुग्रहाच्या संभाव्य धडकेपासून वाचविण्यासाठी नासाचे यान अवकाशात चकरा मारत असलेल्या लघुग्रहावर धडकणार आहे. सध्या तरी या मिशनचे लक्ष्य लघुग्रहाची दिशा बदलते की नाही, याची चाचपणी करण्याचे आहे. लघुग्रहावर हे यान ताशी 23,760 किमी वेगाने धडकेल आणि त्यानंतर त्या खगोलीय पिंडाच्या दिशेवर बदल होतो काय? याचा अभ्यास केला जाईल. या सर्व घटनेचे रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे. तसेच धडकेदरम्यान लघुग्रहाचे वातावरण, धातू, धूळ व माती इत्यादींचा अभ्यास करण्यात येणार आह6े.

या मिशनचे नाव ‘डबल अ‍ॅस्ट्रॉईड रिडायरेक्शन टेस्ट’ असे असे असून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने राबविले जाणार आहे. या तंत्रज्ञानाला ‘काइनेटिक इम्पॅक्टर टेक्निक’ असे म्हटले जाते. पृथ्वीला धोकादायक ठरू पाहणार्‍या लघुग्रहाला धडक देऊन त्याची दिशा बदलण्यासाठीचे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. ज्या लघुग्रहावर ‘डार्ट स्पेसक्राफ्ट’ धडकणार आहे त्याला ‘डिडिमोस’ या नावाने ओळखले जाते. सुमारे 2600 फूट इतका त्याचा व्यास आहे.

Back to top button