गंगेतील उपयुक्त जीवाणू होत आहेत नष्ट | पुढारी

गंगेतील उपयुक्त जीवाणू होत आहेत नष्ट

हरिद्वार ः गंगा ही भारतीयांसाठी केवळ एक ‘नदी’ नाही. तिचे जनमानसातील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. हे स्थान मिळण्यामागेही अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे गंगा नदीचे स्वच्छ राहणारे पाणी. प्राचीन काळापासूनच गंगा नदीतील सूक्ष्म जीव, खनिजे यामुळे या पाण्याची गुणवत्ता वेगळीच असल्याचे दिसून आलेले आहे. गंगेच्या पाण्यातील काही उपयुक्त अशा जीवाणूंची (मायक्रो इनवर्टेब—ेटस्) संख्या आता प्रदूषणामुळे कमी होत चालल्याचे दिसून आले आहे. भारतीय वन्यजीव संस्थानाच्या वैज्ञानिकांनी याबाबतची माहिती दिली आहे.

गोमुखपासून देवप्रयागपर्यंत अनेक स्थानांवर भागिरथीच्या पाण्यात हे उपयुक्त जीवाणू पूर्णपणे नामशेष झाल्याचे किंवा अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे. हीच स्थिती माणापासून देवप्रयागपर्यंत अलकनंदामध्येही आहे. या दोन्ही नद्यांमधील जीवाणू कमी संख्येत आढळणे याच गोष्टीचे संकेत देते की पाण्याची गुणवत्ता सध्या ठीक नाही. याबाबत वैज्ञानिकांची टीम एक विस्तृत रिपोर्ट तयार करीत आहे. गंगेच्या पाण्याची नैसर्गिक शुद्धता ही ‘बॅट्रियाफोस’ बॅक्टेरियामुळे बनत असते असे संशोधनांमधून आढळून आलेले आहे. हा जीवाणू गंगेच्या पाण्यात रासायनिक क्रियांमुळे उत्पन्न होणारे घातक पदार्थ नष्ट करतात. त्यामुळे गंगाजल हे नैसर्गिकरीत्या शुद्ध राहत असते व ते बराच काळ खराब होत नाही. मात्र, आता अशा ‘मित्र जीवाणूं’ची संख्या खालावत आहे. काही ठिकाणी तर ती 15 टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button