मेंदूतील अपस्माराचे केंद्र शोधणारे नवे उपकरण | पुढारी

मेंदूतील अपस्माराचे केंद्र शोधणारे नवे उपकरण

नवी दिल्ली ः ‘एपिलेप्सी’ला मराठी अपस्मार आणि हिंदीत ‘मिर्गी’ म्हणतात. ‘फेफरे येणे’ असाही शब्दप्रयोग या समस्येबाबत केला जात असतो. हा जगातील चौथा सर्वाधिक प्रमाणात आढळणारा चेतासंस्थेचा विकार आहे. दरवर्षी लाखो लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येचा शरीरावर आंशिक किंवा संपूर्णपणे पडणारा अनैच्छिक प्रभाव पाहायला मिळतो. शरीरात अत्याधिक किंवा असंतुलित विद्युत प्रवाह वाहिल्याने चेतना लुप्त होऊन ही स्थिती निर्माण होते. अशा लोकांना आपल्या आतडे किंवा मूत्राशयावरही नियंत्रण राहत नाही. आता या समस्येशी संबंधित मेंदूतील केंद्र शोधण्यासाठी भारतीय संशोधकाने एका उपकरणाची निर्मिती केली आहे.

अपस्माराला जबाबदार असलेल्या मेंदूतील भागाला ‘एपिलेप्टोजेनिक झोन’ असे म्हटले जाते. त्याची ओळख करण्यासाठी भारतीय संशोधकांनी एका नव्या डायनोस्टिक उपकरणाची निर्मिती केली आहे. हे उपकरण सध्याच्या प्रचलित उपकरणांच्या तुलनेत अधिक सरस असल्याचा संशोधकांचा दावा आहे. त्याच्या सहाय्याने कोणतीही चिरफाड न करता कमीत कमी वेळेत ‘एपिलेप्टोजेनिक झोन’ची ओळख करता येते. आयआयटी दिल्लीच्या संशोधकांनी हे उपकरण तयार केले आहे. अपस्माराला सर्वसाधारणपणे औषधांनीच नियंत्रित केले जाते. ज्यावेळी औषधे अपस्माराच्या झटक्यांना नियंत्रित करण्यात अपयशी ठरतात त्यावेळी त्याला ‘औषधरोधी अपस्मार’ म्हटले जाते.

मेंदूतील संरचनात्मक असामान्य गोष्टी औषधरोधी अपस्माराला जबाबदार ठरतात. त्यामुळे मेंदूची शस्त्रक्रियाच रुग्णाला दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा उपाय ठरते. मात्र, सर्जिकल मूल्यांकनामधील सर्वात कठीण काम विद्युतीय असामान्यतेच्या उत्पत्तीचे निर्धारण करणे आणि मेंदूच्या संरचनात्मक असामान्यतेशी त्याचा संबंध शोधणे हे आहे. या असामान्यता इतक्या सूक्ष्म असतात की एकट्या ‘एमआरआय’ नेही त्याची ओळख करणे कठीण होते. त्यासाठी इलेक्ट्रोएन्सेफलोग्राम (ईईजी) मूल्यांकनाबरोबर संशोधन करावे लागते.

क्रॅनियोटॉमी आणि रोबो-असिस्टेड सर्जरीत चिरफाड करावी लागते. आता आयआयटी दिल्लीतील ललन कुमार यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या एका टीमने कोणत्याही चिरफाडशिवाय ईईजी आधारित ब—ेन सोर्स लोकलायझेशन (बीएसएल) फ—ेमवर्क विकसित केले आहे जे कमी वेळेतच निष्कर्ष सांगते. अपस्माराच्या वेळेचा संबंधित ईईजी डेटावर आधारित आकड्यांच्या संरचनेच्या पृथःकरणाशी निगडीत अ‍ॅल्गोरिदम काही मिनिटांतच निर्दिष्ट क्षेत्राला दाखवते.

Back to top button