‘या’ पक्ष्याचे वजन अवघे दोन ग्रॅम | पुढारी

‘या’ पक्ष्याचे वजन अवघे दोन ग्रॅम

नवी दिल्ली : जगात असे अब्जावधी जीव आहेत की, त्यांना निसर्गाने काही ना काही विशेष दिले आहे. यामुळेच ते आपले जीवन जगत असतात. यापैकी एक पक्षी म्हणजे ‘हमिंगबर्ड’ होय. हा इवलासा जीव इतर पक्ष्यांच्या तुलनेत एका सेकंदात सर्वाधिक वेळा पंख फडफडू शकतो.

हमिंगबर्ड इतक्या वेगाने उडू शकतो की, तो क्षणार्धात नजरेसमोरून नाहीसा होतो. त्याच्या पंखाच्या फडफडण्यातून हमिंग असा आवाज येतो. यामुळेच त्याला हमिंगबर्ड असे नाव देण्यात आले आहे.

‘डिस्कव्हर वाईल्ड लाईफ वेबसाईट’ने दिलेल्या माहितीनुसार जगभरात हमिंगबर्डच्या एकूण 350 प्रजाती आहेत. यापैकी सर्वात लहान असलेल्या पक्ष्याला ‘बी हमिंगबर्ड’ या नावाने ओळखले जाते. उल्लेखनीय म्हणजे बी हमिंगबर्डचे वजन अवघे 2 ग्रॅम आणि लांबी पाच सेंटिमीटर इतकी असते. तसे पाहिल्यास सर्वसामान्य हमिंगबर्डचे वजन 4 ते 8 ग्रॅम इतके असते. काही हमिंगबर्ड 23 सेंटिमीटर लांब व वजन 20 गॅमपर्यंत असू शकते.

हमिंगबर्डची एक सर्वात खास बाब म्हणजे हा जीव एकदम सावकाश म्हणजे एका सेकंदात 12 वेळा आपले पंख फडफडू शकतो. मात्र, या प्रजातीमधील काही पक्षी एक सेकंदात 50 ते 80 वेळा पंख फडफडू शकतात. मात्र, ज्यावेळी हमिंगबर्ड हवेत झेप घेतो, त्यावेळी तो सेकंदात सुमारे 200 वेळा पंख फडफडतो. इतक्या वेगाने पंख फडफडल्याने हृदयाच्या धडधडणेही वाढते. या पक्षाचे एका मिनिटात तब्बल 1200 वेळा हृदय धडधडते. याशिवाय या जीवाची नजर माणसापेक्षा कितीतरी पटीने तीक्ष्ण असते.

Back to top button