कोरोनानंतर बदलले कार्यालयीन वातावरण | पुढारी

कोरोनानंतर बदलले कार्यालयीन वातावरण

वॉशिंग्टन : अत्यंत अनपेक्षितपणे जगासमोर कोरोनाचे संकट येऊन उभे राहिले आणि त्यामुळे जगात मोठीच उलथापालथ झाली. त्याचे काही तत्काळ व दूरगामीही परिणाम झाले. आताही कोरोना महामारीने झालेले काही बदल पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये व्यक्‍तिगत जीवनातील बदलांपासून सामाजिक बदलांपर्यंतच्या अनेक गोष्टी आहेत. कार्यालयीन जीवनावरही याचा परिणाम दिसून येत आहे. ऑफिसमध्ये गेल्यावर आपले खासगी जीवन बाजूला ठेवणे व इतरांशी केवळ औपचारिक बोलणे करून आपले काम करू लागण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. आता लोक कार्यालयातही आपल्या व्यक्‍तिगत अडचणी, दुःखे सहकार्‍यांशी ‘शेअर’ करू लागले असल्याचे चित्र आहे. ‘लिंक्डिन’च्या एका नव्या सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे.

या सर्व्हेनुसार कर्मचार्‍यांना आता असा बॉस आणि असे सहकारी हवे आहेत जे त्यांच्या खासगी अडचणी व भावनांना समजून घेऊ शकतील. ‘लिंक्डिन’ने जगभरातील 23 हजार कर्मचार्‍यांवर याबाबतचा सर्व्हे केला, त्यापैकी 61 टक्के लोकांनी ऑफिसमध्ये ‘सॉफ्ट स्किल्स’ची तितकीच गरज असल्याचे मत व्यक्‍त केले जितकी हार्ड स्किल्सची. एका अन्य सर्व्हेमधून असे दिसून आले की ज्या कर्मचार्‍यांना असे वाटते की कंपनीचे व्यवस्थापन आपल्याला समजून घेत नाही, ते नव्या नोकरीचा शोध घेण्यास सुरुवात करतात. ज्या कर्मचार्‍यांना वाटते की कंपनी त्यांची काळजी घेत आहे, ते कंपनीत संतुष्ट राहतात व नोकरी बदलण्याची त्यांना इच्छा होत नाही. अमेरिकेतील ‘पिपल सायन्स अ‍ॅट हेमू’च्या संस्थापिका डॉ. जेसी विजडम यांनी सांगितले की कोरोनानंतर जीवन अधिक कठीण बनले आहे. त्यामुळे कंपन्यांनीही कर्मचार्‍यांची काळजी घेणे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ऑफिसमध्ये आपल्या सहकार्‍यांचा सहयोग, त्यांच्याशी चांगल्या संवादाबरोबरच त्यांच्या भावनांचा सन्मान करणे म्हणजेच ऑफिसमधील ‘सॉफ्ट स्किल्स’ होय. कंपन्यांच्या मॅनेजरनी स्वतःच आपल्या सहकार्‍यांशी बातचित सुरू करून त्यांचे ऐकून घ्यावे. आपण सर्व एकाच कुटुंबाचे, समूहाचे भाग आहोत अशी भावना कर्मचार्‍यांमध्ये निर्माण करावी.

Back to top button