राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या ‘अशा’ही परंपरा | पुढारी

राष्ट्राध्यक्ष बनण्याच्या ‘अशा’ही परंपरा

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. अनेकांना 25 जुलै ही तारीख आणि सेंट्रल हॉल हे ठिकाण याबाबतही कुतुहल वाटत असेल. भारताच्या संसदेत राज्यसभा, लोकसभा आणि राष्ट्रपती असे तीन भाग समाविष्ट आहेत. त्यामुळे राष्ट्रपती हे संसदेच्या सेंट्रल हॉलमध्येच पदाची शपथ घेतात. 55 वर्षांपूर्वी म्हणजेच 25 जुलै 1977 रोजी नीलम संजीव रेड्डी यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 25 जुलैला राष्ट्रपतींनी शपथ घेण्याची जणू प्रथाच निर्माण झाली. आतापर्यंत नऊ राष्ट्रपतींनी 25 जुलैला शपथ घेतली आहे. अनेक देशांमध्ये अशाच काही रंजक गोष्टी तेथील राष्ट्राध्यक्षांबाबत असतात. त्यांची ही माहिती…

टांझानिया : या देशाचे राष्ट्राध्यक्ष हे ‘हेड ऑफ स्टेट’ आणि ‘हेड ऑफ गव्हर्न्मेंट’ही असतात. अर्थातच तेथील राष्ट्राध्यक्षांचे पद अतिशय शक्तिशाली आहे. दर पाच वर्षांनी तेथील जनता सार्वत्रिक निवडणुकीतून राष्ट्राध्यक्षांची निवड करते. टांझानियामध्ये कोणतीही व्यक्ती केवळ दोन वेळाच राष्ट्राध्यक्ष बनू शकते. तेथील राष्ट्राध्यक्षांनी शपथ घेताच त्यांना संविधानाबरोबरच भाला आणि ढाल या वस्तू दिल्या जातात. 9 डिसेंबर 1961 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच ही परंपरा सुरू आहे. ढाल आणि भाला ही मसाई जनजातीची प्रमुख शस्त्रे आहेत.

इंडोनेशिया : या देशातही प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे. तिथेही राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख आणि सरकारचा प्रमुखही असतो. इंडोनेशियातही राष्ट्राध्यक्षांना थेट जनतेमधूनच निवडले जाते. राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो आणि एखादा राष्ट्राध्यक्ष जास्तीत जास्त दोनवेळा पदासाठी निवडला जाऊ शकतो. शपथग्रहणावेळी एक धर्मगुरू राष्ट्राध्यक्षांच्या डोक्यावर काही अंतर ठेवून धर्मग्रंथ धरून उभा असतो. या धर्मग्रंथाच्या छायेतच राष्ट्राध्यक्ष शपथ घेतात.

फिलीपाईन्स : या देशातही राष्ट्राध्यक्षच ‘हेड ऑफ स्टेट’ आणि ‘हेड ऑफ गव्हर्न्मेंट’ असतो. त्यामुळे तिथेही हे पद अत्यंत शक्तिशाली आहे. राष्ट्राध्यक्षांची निवड थेट जनतेतून होते व राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. विशेष म्हणजे शपथग्रहणावेळी राष्ट्राध्यक्ष पायनापल म्हणजेच अननसाच्या धाग्यांपासून बनवलेला परंपरागत शर्ट परिधान करतात. या शर्टला ‘बारोंग तागालोग’ असे म्हटले जाते. हा फिलीपाईन्समधील राष्ट्रीय पोशाख आहे. तेथील राष्ट्राध्यक्ष 30 जूनला शपथ घेतात.

रशिया : येथे सेमी-प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे. मात्र, सरकारमधील बहुतांश शक्ती राष्ट्राध्यक्षांकडेच असते. देशातील जनताच राष्ट्राध्यक्ष निवडतात. 2008 पासून राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ 6 वर्षांचा करण्यात आला आहे, जो जास्तीत जास्त दोन कार्यकाळासाठी असू शकतो. रशियन राष्ट्राध्यक्षांना कॉन्स्टिट्यूशनल कोर्टचे चेअरमन शपथ देतात. त्यावेळी मंचावर संविधानाची प्रत आणि प्रेसिडेंटस् चेन ऑफ ऑफिस म्हणजेच एक सोन्याचा हार ठेवलेला असतो. कॉन्स्टिट्यूशनल कोर्टचे चेअरमन हा सोन्याचा हार नव्या राष्ट्राध्यक्षांना देतात आणि शपथ ग्रहण समारंभ पूर्ण झाल्याची घोषणा करतात. या हारात नऊ रशियन राजकीय चिन्हे आणि आठ गुच्छ असतात.

फ्रान्स : या देशातही सेमी-प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे. तेथील सरकारमधील बहुतांश सत्ता ही राष्ट्राध्यक्षांकडेच असते. राष्ट्राध्यक्षांना थेट जनतेमधूनच निवडले जाते. सन 2000 पर्यंत राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सात वर्षांचा होता, मात्र, आता तो घटवून पाच वर्षांचा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तेथील नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष शपथ घेत नाहीत. केवळ त्यांच्या नावाची घोषणा झाल्यावर ते राष्ट्राध्यक्ष बनतात. अर्थात या समारंभात अनेक कार्यक्रमांची रेलचेल असते. तेथील कॉन्स्टिट्यूशनल कौन्सिलचे अध्यक्ष राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल घोषित करतात आणि या घोषणेपासूनच राष्ट्राध्यक्षांचा कार्यकाळ सुरू होतो. त्यानंतर ग्रँड चान्सेलर नव्या राष्ट्राध्यक्षांना ‘ग्रँड कॉलर ऑफ द लेजन ऑफ ऑनर’ सोपवतात. ‘ग्रँड कॉलर’ हे फ्रान्सचे सर्वोच्च ऑर्डर ऑफ मेरिट आहे. ‘ग्रँड कॉलर’ ही सोळा कड्यांनी बनलेली एक सोन्याची साखळी असते. या परंपरेची सुरुवात नेपोलियन बोनापार्टने सन 1802 मध्ये केली होती.

अमेरिका : या देशातही राष्ट्राध्यक्षच ‘हेड ऑफ स्टेट’ आणि ‘हेड ऑफ गव्हर्न्मेंट’ असतो. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपद अतिशय शक्तिशाली असते व त्यांच्याकडे मोठी सत्ता असते. मात्र, अमेरिकेतील मतदार थेटपणे आपला राष्ट्राध्यक्ष निवडू शकत नाहीत. मतदार आपले प्रतिनिधी म्हणजेच ‘इलेक्टर’ निवडतात आणि हे इलेक्टर नवे राष्ट्राध्यक्ष निवडतात. अमेरिकेत 1933 पर्यंत 4 मार्चला राष्ट्राध्यक्ष शपथ घेत होते. मात्र, संविधानातील 20 व्या दुरुस्तीनंतर ही तारीख 20 जानेवारी करण्यात आली.

Back to top button