‘नासा’च्या रोव्हरला दिसल्या मंगळावरील टेकड्या | पुढारी

‘नासा’च्या रोव्हरला दिसल्या मंगळावरील टेकड्या

 वॉशिंग्टन :   मंगळभूमीवर वावरत असलेल्या ‘नासा’च्या ‘क्युरिऑसिटी’ या रोव्हरने मंगळावरील टेकड्यांचे छायाचित्र पाठवले आहे. या रोव्हरच्या नव्या छायाचित्रांमुळे एके काळी मंगळावरील वातावरण कोरडे पडल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे याठिकाणी असलेल्या जलधाराही कोरड्या पडलेल्या असाव्यात.

‘क्युरिऑसिटी’ रोव्हर मातीने भरलेल्या क्षेत्रातील क्षारयुक्‍त खनिज सल्फेटने भरलेल्या एका ट्रान्झिशन झोनमधून प्रवास करीत आहे. रोव्हरने पाठवलेल्या छायाचित्रात टेकड्या दिसत असून वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की याठिकाणी असलेले वातावरण कोरडे पडले असावे. त्यामुळेच या टेकड्यांच्या अवतीभोवती असलेले पाणी आटले असणार व या मातीच्या टेकड्यांची निर्मिती झाली. अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळाच्या वातावरणात झालेल्या मोठ्या बदलास या टेकड्या दर्शवत आहेत. क्युरिऑसिटी रोव्हर सातत्याने उंच ठिकाणी जात आहे. त्या उंचीवरून या टेकड्या दिसत आहेत.

‘नासा’च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीमधील क्युरिऑसिटीचे प्रोजेक्ट सायंटिस्ट अश्‍विन वसवदा यांनी सांगितले की या कोरड्या टेकड्यांच्या चारही बाजूंनी कधी काळी पाण्याचे प्रवाह वाहत असावेत. लाखो वर्षांपूर्वी बनलेल्या सरोवरांना मोठ्या बदलास समोर जावे लागले असावे. रोव्हर जसे जसे वर जात आहेत तसे त्याला माती कमी व सल्फेट अधिक आढळत आहे. या खडकांची बदलती खनिज संरचना वैज्ञानिकांना थक्‍क करीत आहे.

Back to top button