पृथ्वीपेक्षाही जास्त संपत्ती असलेला लघुग्रह | पुढारी

पृथ्वीपेक्षाही जास्त संपत्ती असलेला लघुग्रह

वॉशिंग्टन : अंतराळ हे आश्‍चर्यचकित करणार्‍या वस्तूंनी भरलेले आहे. पृथ्वीवर ज्या वस्तू अत्यंत महागड्या आहेत, त्या अंतराळात एखाद्या खडकाप्रमाणे फिरत आहेत. असाच एक लघुग्रह असून, त्याचे नाव ‘16-साइकी एस्ट्रॉईड’ असे आहे. हा लघुग्रह मौल्यवान खनिजांनी भरलेला आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास या लघुग्रहावर इतकी मौल्यवान खनिजे आहे की, त्यांची किंमत समस्त पृथ्वीच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही कितीतरी जास्त आहे.

खगोलशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार, ‘16-साइकी’ लघुग्रहावर 10 हजार क्वाड्रियन डॉलरचा खजिना आहे. इतका मौल्यवान खजिना असला तरी या लघुग्रहावर पोहोचणेही तितकेच अवघड आहे. कारण, तेथे जाऊन खोदकाम करण्यास पूर्ण पृथ्वीच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त खर्च येऊ शकतो. ‘16-साइकी एस्ट्रॉईड’वर प्रामुख्याने लोह, निकेल व सोने मोठ्या प्रमाणात असून, अन्य खनिजेही तेथे आहेत.

आपल्या सूर्यमालेतील अनेक मोठ्या लघुग्रहांपैकी ‘16-साइकी एस्ट्रॉईड’ हा एक आहे. त्याचा व्यास सुमारे 140 कि.मी. इतका आहे. एखाद्या बटाट्याप्रमाणे दिसणारा हा लघुग्रह मंगळ व गुरू यांच्यादरम्यान असलेल्या अ‍ॅस्ट्रॉईड बेल्टमध्ये आहे. तो सूर्याभोवती एक फेरा पाच वर्षांत पूर्ण करतो. 16-साइकी या रहस्यमयी लघुग्रहाचा शोध इटलीचे खगोलशास्त्रज्ञ एनिबल डी गॅस्पारिस यांनी लावला होता. त्यानंतर या लघुग्रहाला इटलीची देवता साईकीचे नाव दिले गेले. येत्या ऑगस्टमध्ये नासा या लघुग्रहासाठी मिशन लाँच करण्याची योजना तयार करत आहे.

Back to top button