बॉलपेनने बिंदू बनवत रेखाटली चित्रे! | पुढारी

बॉलपेनने बिंदू बनवत रेखाटली चित्रे!

कोलकाता :

कोणत्याही अस्सल कलाकाराला आपल्या कलेचा आविष्कार करण्यासाठी कोणतेही साधन चालते. पश्‍चिम बंगालमधील बिमन दास हा कलाकार बॉलपेनच्या ‘डॉट ड्रॉईंग’मुळे आता वाहवा मिळवत आहे. त्यांनी बॉलपेनने छोटे बिंदू बनवत अनेक प्रसिद्ध व्यक्‍तींची चित्रे बनवली आहेत. याबाबत त्यांच्या नावाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्’ मध्ये करण्यात आली आहे.

पश्‍चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यातील इचापूर या गावी ते राहतात. बिमन यांनी आर्ट कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले असून ते व्यवसायानेही चित्रकार आहेत. पारंपरिक शैलीचा वापर न करता त्यांनी वेगळा मार्ग चोखाळला आहे. चित्र रेखाटत असताना ते रेषांचा वापर न करता बिंदूंचा वापर करतात. त्यामुळेच त्यांची ही शैली वेगळी, उठून दिसते. त्यांनी आतापर्यंत रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, शारदा माता, महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस, सुचित्रा सेन, सौरव गांगुली अशा अनेकांची चित्रे बनवली आहेत. ही चित्रे रेखाटण्यासाठी त्यांनी केवळ बॉलपॉईंट पेनचा वापर केला आहे. एक चित्र पूर्ण करण्यासाठी त्यांना तीन ते चार दिवस लागतात.

Back to top button