Onion Price | निर्यातबंदी उठविल्यानंतरही कांद्याच्या दरात घसरण मात्र सुरूच

Onion Price | निर्यातबंदी उठविल्यानंतरही कांद्याच्या दरात घसरण मात्र सुरूच
Published on
Updated on

लासलगाव, जि. नाशिक : पुढारी वृत्तसेवा – केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठविल्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याची आवक सुरू आहे. मात्र, कांदा निर्यातीवर असलेल्या निर्यातशुल्काचा फटका कांदा निर्यातदारांसह कांदा उत्पादकांना बसत असून, कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कांदा पुन्हा ७०० रुपयांपर्यंत गडगडल्याने निर्यातबंदी मागे घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांसाठी केवळ देखावाच असल्याची टीका कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.

किमान निर्यातमूल्य आणि निर्यातशुल्क मिळून कांदा निर्यात किंमत प्रतिकिलो ६५ ते ७० रुपयांपर्यंत होते. निर्यातदारांना निर्यातशुल्क द्यावे लागते. केंद्राने निर्यातीस परवानगी दिली खरी, मात्र निर्यातमूल्य व निर्यातशुल्क लादून एकप्रकारे खोडा कायम ठेवला आहे. त्यामुळे दरावर परिणाम झालेला दिसून येत आहे. कुठल्याही अटी-शर्तींशिवाय निर्यातबंदी खुली व्हावी अशी मागणी कांदा उत्पादक शेतकरी करत आहेत.
कांदा निर्यातबंदी हटविल्यानंतर खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी खत, बियाणे आदी खरेदी करण्यासाठी साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. दि. ४ मे रोजी कांद्याला सरासरी २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. त्यानंतर निर्यातशुल्क जाहीर झाल्यानंतर पुन्हा कांद्याच्या भावाला उतरती कळा लागली. दि. ४ मेच्या तुलनेत शुक्रवारी (दि. १७) कांद्याचे सरासरी भाव ७०० रुपयांनी घटून १४०० रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५००, तर जास्तीत जास्त २००० तसेच सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले.

कांदा निर्यातबंदी उठवल्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक सुरू झाली आहे. दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी लासलगाव बाजार समिती नेहमीच तत्पर असल्याने माल विक्रीनंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ताबडतोब पेमेंट अदा केले जाते. – नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती

केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण चुकीचे असून, केंद्र सरकारने ३ मे रोजी परिपत्रक जारी करून कांद्यावरील निर्यातबंदी उठवल्याचे सांगितले. परिणामी कांदा दरात काहीशी वाढ होऊन दर २१०० रुपये प्रतिक्विंटल पर्यंत पोहोचले होते. मात्र सद्यस्थितीत भाव तब्बल ७०० रुपयांनी घसरले आहे. निर्यातबंदी ही केवळ कागदावरच असून, शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही. – सचिन होळकर, कृषी तज्ज्ञ, लासलगाव.

किमान निर्यातमूल्य आणि निर्यातशुल्क मिळून कांदा निर्यात किंमत प्रतिकिलो ६५ ते ७० रुपयांपर्यंत होते. केंद्राने निर्यातीस परवानगी दिली खरी, मात्र निर्यातमूल्य व निर्यातशुल्क लादून एकप्रकारे खोडा कायम ठेवला आहे. कांद्याची जागतिक बाजारपेठ पुन्हा काबीज करायची असेल, तर सरकाने निर्यातशुल्क हटवले पाहिजे. – अफजल शेख, कांदा निर्यातदार, लासलगाव.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news