सेरेस लघुग्रहावर खार्‍या पाण्याचा समुद्र! | पुढारी

सेरेस लघुग्रहावर खार्‍या पाण्याचा समुद्र!

वॉशिंग्टन :

मंगळ आणि गुरू या ग्रहांदरम्यान असलेल्या ‘अ‍ॅस्टोरॉईड बेल्ट’मध्ये अनेक लहान-मोठे लघुग्रह आहेत. त्यापैकी सर्वात मोठा लघुग्रह असलेल्या ‘सेरेस’वर खार्‍या पाण्याचा समुद्र असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. त्याच्या गोठलेल्या पृष्ठभागाखाली हा समुद्र असल्याचा छडा संशोधकांनी लावला आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टीचीही शक्यता वर्तवली जात आहे.

‘नासा’च्या ‘डॉन’ या अंतराळयानाने दिलेल्या डाटाचा वापर करून याबाबतचे संशोधन केले असून त्याची माहिती सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. हे यान 2018 मध्ये सेरेसच्या पृष्ठभागापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरून उडाले होते. त्यावेळी यानाने नोंदवलेल्या निरीक्षणावरून या लघुग्रहाबाबतची नवी माहिती स्पष्ट होत आहे. या लघुग्रहावर बर्फाळ सामग्री असलेले ज्वालामुखी म्हणजेच ‘क्रायोव्होल्कॅनिझम’ अस्तित्वात आहे. या ज्वालामुखींमुळे सेरेसची भूमी सक्रिय आहे. सेरेसच्या बर्फाळ पृष्ठभागाखाली खार्‍या पाण्याचा मोठा साठा असल्याचेही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे सेरेसला आता ‘ओशन वर्ल्ड’चा दर्जा मिळालेला आहे. संपूर्ण लघुग्रहावर असे पाणी आहे की नाही हे सांगता येत नसले तरी त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध आहे हे नक्‍की, असे कॅरोल रेमंड या संशोधकांनी म्हटले आहे. सेरेसचा व्यास 950 किलोमीटर आहे. संशोधकांनी त्यावरील 92 किलोमीटर रुंदीच्या ‘ऑकेटर क्रेटर’ असे नाव असलेल्या विवरावर लक्ष केंद्रीत केले होते. हे विवर सेरेसच्या उत्तर गोलार्धात आहे. तिथेच या खार्‍या पाण्याच्या समुद्राचा छडा लावला आहे.

Back to top button