तेलंगणात कोरोनातून बर्‍या झालेल्या दोघांना पुन्हा संक्रमण | पुढारी

तेलंगणात कोरोनातून बर्‍या झालेल्या दोघांना पुन्हा संक्रमण

हैदराबाद : हाँगकाँगमध्ये एका तरुणाला कोरोनातून बरे झाल्यावर साडेचार महिन्यांमध्येच पुन्हा एकदा संक्रमण झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता आपल्या देशातही अशी प्रकरणे समोर आली आहेत. तेलंगणामध्ये कोरोनातून एकदा बरे झालेल्या दोन रुग्णांना आता पुन्हा एकदा कोरोना संक्रमण झाले आहे. 

कोरोनातून बरे झाल्यावर त्याविरुद्ध शरीरात अँटिबॉडीज तयार होतात व विषाणूविरुद्ध लढण्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होते असे मानले जाते. अशी क्षमता असल्यावर संबंधित व्यक्तीला पुन्हा कोरोनाचे संक्रमण होऊ शकत नाही असेही म्हटले जात होते; पण आता ही धारणाही कोरोनासारख्या मायावी व अद़ृश्य शत्रूने खोटी ठरवली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्ध जगभर ज्या लसींची निर्मिती केली जात आहे त्या कितपत यशस्वी ठरतील असाही प्रश्न निर्माण झाला आहे. तेलंगणाच्या आरोग्यमंत्री इतेला राजेंदर यांनी सांगितले, कोरोनातून बरे झाल्यावर संबंधित व्यक्तीला पुन्हा संक्रमण होणार नाही याची अजिबात खात्री देता येत नाही. पहिल्या संक्रमणानंतर ज्याच्या शरीरात पुरेशा प्रमाणात अँटिबॉडीज विकसित झालेल्या नाहीत अशा व्यक्तीला दुसर्‍यांदा ‘कोविड-19’ चा धोका संभवतो. आतापर्यंत एक लाख कोरोना केसेसपैकी केवळ दोघांनाच दुसर्‍यांदा संक्रमण झाल्याची पुष्टी झालेली आहे.

संबंधित बातम्या
Back to top button