तब्बल आठ मीटरवरून  कोरोना रुग्णाची तपासणी | पुढारी

तब्बल आठ मीटरवरून  कोरोना रुग्णाची तपासणी

प्रयागराज : जगाबरोबरच भारतातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोना योद्ध्यांसाठी ‘सामाजिक अंतर’ अत्यंत महत्त्वाचे ठरते. अन्यथा या लोकांनाही कोरोना आपल्या विळख्यात ओढण्याची शक्यता असते. हीच गरज नजरेसमोर ठेवून ‘एमएनएनआयटी’चे संशोधक असे एक सेन्सर विकसित करत आहेत, की त्याच्या मदतीने डॉक्टर रुग्णाला स्पर्श न करता त्यांची तपासणी करू शकणार आहेत. 

‘एमएनएनआयटी’च्या अप्लाईड मेकॅनिक्स विभागाचे डॉ. आशुतोष मिश्र, सजल बाबू, डॉ. रमेश पांडे हे संशोधक पथक डॉ. अभिषेक तिवारी संस्थेचे संचालक प्रा. राजीव त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी उपयुक्त ठरू पाहणारे हे ‘सेन्सर’ विकसित करत आहेत. या सेन्सरच्या मदतीने डॉक्टर कोरोना रुग्णांची तब्बल आठ मीटर अंतरावरून तपासणी करू शकणार आहेत. यामुळे डॉक्टरही कोरोनाच्या विळख्यात सापडणार नाहीत. 

संशोधक विद्यार्थी सजल बाबू यांनी सांगितले, की सेन्सर विकसित करण्याच्या कामास चार महिन्यांपूर्वीच सुरुवात करण्यात आली होती; मात्र लॉकडाऊनमुळे काही उपकरणे मिळण्यास अडचणी येत होत्या. आता उपकरणे मिळण्यास सुरुवात झाली असून हे सेन्सर आता सप्टेंबरमध्ये तयार होईल, असा विश्वास आहे.

Back to top button