कारच्या इंजिनमध्ये आढळला मोठा अजगर | पुढारी

कारच्या इंजिनमध्ये आढळला मोठा अजगर

फ्लोरिडा : साप आणि त्यातही अजगर हा शब्द कानावर पडल्यावर मनात भीती दाटून आल्याशिवाय राहत नाही. हा सरपटणारा प्राणी कोठेही आढळून येतो. अमेरिकेतील फ्लोरिडा शहरामध्ये एका अजगराने कारच्या इंजिनमध्येच ठाण मांडले होते. वन्यजीव अधिकार्‍यांनी मोठ्या प्रयत्नानंतर या धुडास पकडण्यास यश मिळविले. 

मालकाने बाहेर जाण्यापूर्वी कारची पाहणी करण्यासाठी बोनेट उचलले. मात्र, नंतरचे द‍ृश्य पाहून तो प्रचंड घाबरला. कारण इंजिनमध्ये एका भल्या मोठ्या बर्मिज अजगराने ठाण मांडले होते. ही बाब त्याने वन्य अधिकार्‍यांना कळविली. या अधिकार्‍यांनी इंजिनचे कव्हर उघडताच आंगतूक पाहुणा दिसला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अजगराला पकडण्याचे प्रयत्न केले. त्यातील एका अधिकार्‍याने अजगराचे तोंड धरून त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 10 फूट लांब आणि आकाराने मोठा असलेला हा साप त्याला जराही आवरत नव्हता. शेवटी अन्य अधिकार्‍यांनी धाव घेऊन महत्प्रयासाने अजगराला नियंत्रित करून त्याला सुरक्षितपणे एका बॅगेत घालण्यात आले. 

आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. एका यूजरने तर प्रतिक्रिया व्यक्‍त करताना म्हटले आहे की, हे सर्वकाही फारच भीतीदायक होते. संबंधित कारचा मालक पुन्हा एकदा त्या कारमध्ये बसण्याचे धाडस करणार नाही, असेच वाटते.

Back to top button