दोन्ही हात नसताना पायाने चालवते विमान | पुढारी

दोन्ही हात नसताना पायाने चालवते विमान

न्यूयॉर्क : जर आपण एखादे लक्ष्य निश्‍चित केले आणि त्यासाठी कठोर परिश्रम केले तर ते कितीही अवघड असले तरी ते साध्य करता येते. अमेरिकेत अशीच एक महिला आहे. तिला दोन्ही हात नाहीत; पण तिला चक्‍क विमान चालवावयाचे होते. तिने आपली जिद्द सोडली नाही. शेवटी तिने आपले दोन्ही हात नसतानाही विमान चालवून दाखविले. यामुळे तिच्या नावे एक अनोख्या विक्रमाची नोंद झाले आहे. याशिवाय तिच्या या विक्रमाची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’मध्ये नोंद करण्यात आली आहे.

अमेरिकेत राहत असलेल्या या महिलेचे नाव जेसिका कॉक्स असे आहे. जेसिका अशी एक पहिली पायलट आहे की तिला दोन्ही हात नसून ती विमान आपल्या पायाने चालवते. तिच्याकडे सध्या विमान उडविण्याचे अनोखा आणि जगातील पहिला असा परवाना आहे की, केवळ हात नसलेल्या पायलटना देण्यात येतो. 

जेसिकाने केवळ विमान चालवण्याची कला अवगत केली आहे, असे बिल्कूल नाही. कारण तिला भन्‍नाट वेगाने केवळ पायाने कारही चालवता येते. ती स्कूबा डायव्हिंगही करते. तसेच आपल्या पायांच्या बोटांच्या मदतीने की-बोर्डवर टाईपही करते. 

हात नसले तरी जेसिका आपली सर्व कामे स्वतःच करते. ती पायात पेन धरून सुंदर अक्षरात लिखाणही करते. याशिवाय पायांच्या मदतीने ती आईस्क्रीम फस्त करताना जेवण तयार करते आणि खातेसुद्धा. याशिवाय ती घोडेस्वारीही करते, हे विशेष.

Back to top button