अख्खे गाव संक्रमित होऊनही ‘ते’ राहिले सुरक्षित | पुढारी

अख्खे गाव संक्रमित होऊनही ‘ते’ राहिले सुरक्षित

मनाली : कोरोना महामारीच्या काळात शारीरिक अंतर ठेवणे, मास्क व हात स्वच्छ धुणे हे महत्त्वाचेच आहे. याचे काटेकोर पालन केल्यामुळेच हिमाचल प्रदेशातील 52 वर्षांचे एक गृहस्थ अख्खे गाव संक्रमित होऊनही सुरक्षित राहिले. 

हिमाचल प्रदेशच्या थोरंग नावाच्या गावात हा प्रकार घडला आहे. या गावातील 52 वर्षांची व्यक्‍ती वगळता संपूर्ण गाव कोरोना पॉझिटिव्ह होते. भूषण ठाकूर असे त्यांचे नाव. ते गावातील एकमेव अशी व्यक्‍ती आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली नाही. भूषण यांच्या कुटुंबातीलही सर्व सहा सदस्य पॉझिटिव्ह आहेत. भूषण यांनी सांगितले की ज्यावेळी गावात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला त्यावेळेपासूनच ते आयसोलेशनमध्ये राहतात. ते स्वतःचे जेवणही स्वतःच करतात हे विशेष! लाहौल-स्पितीचे सीएमओ डॉ. पालोजोर यांनी सांगितले की भूषण यांनी घेतलेली काळजी व त्याबरोबरच त्यांची मजबूत रोगप्रतिकारक शक्‍ती यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. या गावात 160 लोक राहतात, मात्र हिमवृष्टी सुरू झाल्यावर बरेच लोक कुल्‍लू येथे गेले आहेत. सध्या तिथे 42 लोक असून त्यापैकी 41 लोक पॉझिटिव्ह झाले आहेत.

Back to top button