२०१० ते २०२० या कालखंडात काय काय घडलं? | पुढारी

२०१० ते २०२० या कालखंडात काय काय घडलं?

कोरोना महामारी : 2020 चे वर्ष कोरोना महामारीतच गेले. खरे तर 17 नोव्हेंबर 2019 मध्येच चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता असे म्हटले जाते. मात्र, वूहानमध्ये 1 डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाची पहिली कन्फर्म केस नोंदवण्यात आली. हा आजार मानवातून मानवात संक्रमित होतो याची पुष्टी चीन व जागतिक आरोग्य संघटनेने 20 जानेवारी 2020 पर्यंत केली. 11 फेब्रुवारीस नव्या कोरोना विषाणूचे ‘सार्स-कोव्ह-2’ हे नाव व त्यापासून होणार्‍या आजाराचे ‘कोव्हिड-19’ हे नाव जागतिक आरोग्य संघटनेकडून अधिकृतपणे जारी करण्यात आले. भारतात कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण 30 जानेवारीला समोर आले. या महामारीने आतापर्यंत जगात 1.66 दशलक्षांपेक्षाही अधिक लोकांचा मृत्यू झाला. भारतात आतापर्यंत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या चीन, रशियाने  तसेच एका अमेरिकन कंपनीने कोरोनावर लस विकसित केली असून ब्रिटन व अमेरिकेतही लसीकरणास सुरुवातही झाली आहे. 

केदारनाथ दुर्घटना : जून 2013 मध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेशासह उत्तर भारतात जोरदार पाऊस कोसळून हजारो लोकांचा बळी गेला. केदारनाथ धामात उसळलेल्या प्रलयात मंदिर वाचले; पण मोठीच वित्त व जीवित हानी झाली. 

नेपाळ भूकंप : नेपाळमध्ये 2015 मध्ये विनाशकारी भूकंप आला. 7.8 रिश्टर स्केलच्या या भूकंपाने सुमारे नऊ हजार लोकांचा बळी गेला, मोठीच वित्तहानी झाली. तीस लाखांहून अनेक लोक बेघर झाले.

केरळमध्ये पूर : केरळमध्ये 2018 मध्ये भयावह पूर आला. त्यामध्ये 500 लोकांचा बळी गेला व दोन लाख लोक बेघर झाले.

कोल्हापूर-सांगली महापूर : महाराष्ट्रात 2019 मध्ये  कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात महापुराने थैमान माजवले. अतिवृष्टी व महापुराने मोठेच नुकसान झाले. विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी अनेक दिवस लागले.

‘क्रिकेटच्या देवा’ची निवृत्ती : सचिन तेंडुलकरने 2013 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून आपली निवृत्ती जाहीर केली. विश्‍वचषक जिंकण्याचे स्वप्न साकार झाल्यानंतर सचिनने निवृत्ती स्वीकारली व एका देदीप्यमान कारकिर्दीची थाटात सांगता झाली.

माहीचा गुड बाय! : एम.एस. धोनीने कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती 2014 मध्ये जाहीर केली. 15 ऑगस्ट 2020 मध्ये त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली. 

सर्वात वेगवान माणसाची निवृत्ती : अकरा वेळा ‘वर्ल्ड चॅम्पियन’ बनलेला ‘जगातील सर्वात वेगवान माणूस’, ऑलिम्पिकवीर उसेन बोल्ट याने 2017 मध्ये निवृत्ती जाहीर केली.

सर्वाधिक काळ राजसिंहासनावर : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय या 2015 मध्ये वयाच्या 89 व्या वर्षी ब्रिटिश राजसिंहासनावर सर्वाधिक काळ बसलेल्या व्यक्‍ती ठरल्या. 

‘ब्रेक्झिट’ : 2016 मधील एका जनमत चाचणीत ब्रिटिश लोकांनी ब्रिटनला युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठी कौल दिला. ही घटना ‘ब्रिटिश एक्झिट’ या अर्थाने ‘ब्रेक्झिट’ म्हणून प्रसिद्ध झाली.

हॅरी-मेगनचा ‘राज’त्याग! : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आणि प्रिन्स चार्ल्स व दिवंगत लेडी डायना यांचे धाकटे चिरंजीव हॅरी यांनी पत्नी व अभिनेत्री मेगन मार्केलसह राजघराण्यातील आपली वरिष्ठ सदस्यता 2020 मध्ये सोडून दिली. त्यांनी ‘हिज रॉयल हायनेस’ व ‘हर रॉयल हायनेस’सारख्या उपाध्याही सोडल्या.

हायड्रोजन फ्युएल बस : स्कॉटलंडच्या एबरडीनमध्ये ऑक्टोबर 2020 मध्ये हायड्रोजन इंधनावर चालणार्‍या जगातील पहिल्या डबल डेकर बसची चाचणी झाली. हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणार्‍या या बसचा उद्देश कार्बन उत्सर्जन कमी करणेे हा आहे. 

पॅरिस करार : 2016 मध्ये हवामान बदल, जागतिक तापमानवाढ रोखण्याच्या दिशेने परिणामकारक उपाययोजना करण्यासाठी ऐतिहासिक पॅरिस करार झाला. हा करार 12 डिसेंबर 2015 रोजी तयार करण्यात आला होता व त्याची अंमलबजावणी 4 नोव्हेंबर 2016 पासून करण्यात आली.

ग्रीसची दिवाळखोरी : 2015 मध्ये आर्थिक दिवाळखोरी जाहीर करणारा ग्रीस हा पहिलाच विकसित देश ठरला! 

आफ्रिका झाले पोलिओमुक्‍त : 2020 मध्ये अवघे जग कोरोनाशी लढत असतानाच आफ्रिका खंड पोलिओमुक्‍त झाला. 25 ऑगस्ट 2020 ला जागतिक आरोग्य संघटनेने यावर शिक्‍कामोर्तब केले. 

मदत तेरेसांना ‘संत’ पदवी  : 2016 मध्ये मदर तेरेसा यांना पोप फ्रान्सिस यांनी ‘संत’ म्हणून घोषित केले. 

युतीचे आले सरकार : 31 ऑक्टोबर 2014 मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आले व देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. 

महाविकास आघाडी आली सत्तेवर… : 28 नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले व उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.

मराठा क्रांती मोर्चा : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी 2016 मध्ये अनेक विराट मूक मोर्चे निघाले.

बायडेन, कमला हॅरीस विजयी : 2020 मध्ये अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करून जो बायडेन प्रचंड मतांनी निवडून आले. उपाध्यक्षपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरीसही निवडून आल्याने भारतात आनंद व्यक्‍त करण्यात आला.

ट्रम्प-किम भेट : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची 2018 मध्ये बहुचर्चित भेट झाली. 

नवी दोस्ती : कट्टर शत्रू समजल्या जाणार्‍या इस्रायल आणि संयुक्‍त अरब अमिरातीमध्ये ऑगस्ट 2020 मध्ये ऐतिहासिक शांतता करार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी मध्यस्थी केली. 

सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा : अमेरिकेने सप्टेंबर 2020 मध्ये 3200 मेगापिक्सेलचा जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा विकसित केला. या कॅमेर्‍याच्या सहाय्याने 24 किलोमीटर अंतरावरील चेंडूचा फोटोही टिपता येऊ शकतो हे विशेष! 

मी टू मोहीम : 2017 मध्ये हॉलीवूडचा निर्माता हार्वे विन्स्टन याच्याविरुद्ध सुरू झालेली लैंगिक शोषणाविरुद्धची ‘मी टू’ ही मोहीम नंतर जगभर पसरली व अनेक महिला आपल्याविरुद्ध झालेल्या अन्यायाला वाच फोडण्यासाठी पुढे आल्या.

ब्लॅक लाईव्ज मॅटर : 2020 मध्ये अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या निर्दयी हत्येने जगाला धक्‍काच बसला. पोलिसाच्या गुडघ्याखाली दम तोडत असलेल्या जॉर्जच्या छायाचित्रांनी ‘ब्लॅक लाईव्ज मॅटर’चा आवाज बुलंद केला. त्याचे पडसाद अनेक देशांमध्ये उमटले. 

सर्वाधिक काळ अंतराळात : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अकरा महिने राहिल्यानंतर ‘नासा’ची अंतराळ वीरांगना क्रिस्टिना कोच 6 फेब्रुवारी 2020 या दिवशी पृथ्वीवर परतली. ती अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला ठरली. तिने एकूण 328 दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम केला.

कृष्णविवराचे पहिले छायाचित्र : अंतराळ संशोधन क्षेत्रातील नजीकच्या काळातील सर्वात मोठी घटना म्हणजे कृष्णविवराचे छायाचित्र टिपण्यात आलेले यश. 10 एप्रिल 2019 मध्ये कृष्णविवराचे छायाचित्र टिपण्यात आले.

फाल्कन 9 : 2017 मध्ये ‘स्पेस एक्स’चे ‘फाल्कन 9’ हे रॉकेट पुनर्वापर करता येऊ शकणारे जगातील पहिलेच रॉकेट ठरले.

‘बाहुबली-2’ चे बंपर यश : ‘बाहुबली-2’ या चित्रपटाने 2017 मध्ये देशभरात तब्बल 510 कोटी रुपयांची कमाई करून दशकातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याचा मान मिळवला. दाक्षिणात्य स्टार प्रभास या चित्रपटामुळे देश-विदेशात लोकप्रिय झाला. ‘बाहुबली-2’ नंतर कमाईच्या बाबतीत ‘दंगल’ आणि ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटांचा क्रमांक लागतो.

सीएए : 11 डिसेंबर 2019 मध्ये संसदेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झाले. अफगाणिस्तान, बांगलादेश व पाकिस्तान यासारख्या मुस्लिम देशांमधून भारतात डिसेंबर 2014 पूर्वी आलेल्या हिंदू, शिख, बौद्ध, जैन, पारसी व ख्रिश्‍चन अशा तेथील अल्पसंख्याक लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचा हा सुधारित कायदा झाला. या कायद्यामध्ये मुस्लिम लोकांचा उल्लेख नसल्याने अनेक ठिकाणी त्याविरोधात आंदोलने करण्यात आली.

पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था : फेब्रुवारी 2020 मध्ये आलेल्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ नुसार ब्रिटन आणि फ्रान्सला मागे टाकून भारत जगातील पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली. भारताची जीडीपी 2.94 ट्रिलियन डॉलर्स होती. 

कृषी कायदे : सप्टेंबर 2020 मध्ये संसदेने तीन कृषी विधेयके मंजूर केली. या कायद्यांमुळे शेतकर्‍यांना आपली कृषी उत्पादने कुठेही विकण्याची मोकळीक मिळाली व कॉन्ट्रॅक्ट शेतीसाठीही कायदेशीर आधार मिळाला. देशात विशेषतः पंजाब, हरियाणा व दिल्लीत सप्टेंबरपासूनच या कायद्यांविरोधात आंदोलने सुरू झाली. 

चीनने चंद्रावरून आणले नमुने : अमेरिकेच्या अपोलो मोहिमेनंतर प्रथमच म्हणजे 44 वर्षांनंतर 17 डिसेंबर 2020 रोजी चीनच्या ‘चांग ई-5’ या यानाने चंद्रावरील खडक व मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात यश मिळवले.

Back to top button