टोंगाचा ज्वालामुखी अद्यापही ‘जिवंत’! | पुढारी

टोंगाचा ज्वालामुखी अद्यापही ‘जिवंत’!

लंडन : दक्षिण प्रशांत महासागरातील टोंगा देशात 15 जानेवारीला ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. हा उद्रेक इतका शक्तिशाली होता की त्याचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर झाला. समुद्राच्या खाली झालेल्या या ज्वालामुखीमुळे लाटांवर इतका दबाव बनला की त्याच्यामुळे निर्माण झालेल्या शॉक वेव्ज पृथ्वीच्या वातावरणातूनही गेल्या. तब्बल 140 वर्षांनंतर टोंगाच्या या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. या महाशक्तिशाली स्फोटानंतर खरे तर हा ज्वालामुखी नष्ट होणे अपेक्षित होते; पण वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हा ज्वालामुखी काही बदलांसह अद्यापही जिवंत आहे!

न्यूझीलंडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर वॉटर अँड अ‍ॅटमॉस्फिरिक रिसर्चच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. यापूर्वी 1883 मध्ये इंडोनेशियाच्या क्राकाटोआ येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता आणि त्यामध्ये 36 हजारांपेक्षाही अधिक लोक मारले गेले होते. ‘एनआयडब्ल्यूए’ने या ज्वालामुखीच्या आसपासच्या समुद्रतळावरील 22 हजार चौरस किलोमीटरच्या परिसराचे मॅपिंग केले. त्यापैकी 8 हजार चौरस किलोमीटरच्या परिसरात बदल पाहायला मिळाले. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ज्वालामुखीच्या जवळचा 7 घन किलोमीटरच्या भागातील सामग्री इकडे तिकडे झाली आहे. हे क्षेत्र ऑलिम्पिक साईजच्या 30 लाख स्विमिंग पूल्सइतके आहे. स्फोटामुळे येथील इंटरनेट केबलही नष्ट झाले असून त्यामुळे कम्युनिकेशन खंडित झाले आहे. ही केबल 30 मीटरपर्यंत राख आणि दगडांखाली दबलेली आहे.

Back to top button