‘चॅटबॉट’मुळे ‘बोलता’ येईल मृत व्यक्‍तीशी! | पुढारी

‘चॅटबॉट’मुळे ‘बोलता’ येईल मृत व्यक्‍तीशी!

न्यूयॉर्क ः जे लोक आता जिवंत नाहीत त्यांच्याशी ‘बोलायचे’ म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर हॉरर चित्रपट, प्लँचेट, पॅरानॉर्मल अ‍ॅक्टिव्हिटी अशा गोष्टी येऊ शकतात. मात्र, इथे तसे काही नाही. आता वैज्ञानिक मार्गाने हयात नसलेल्या लोकांशी बोलण्याचा आभास निर्माण केला जाऊ शकतो. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने खास ‘चॅटबॉट’ तयार केले आहे. गेल्या महिन्यातच कंपनीला त्याचे पेटंट मिळाले आहे. ही कल्पना संशोधकांना अमेरिकेतील प्रसिद्ध टी.व्ही. मालिका ‘ब्लॅक मिरर’ मधून सूचली!

या मालिकेमध्ये एक तरुणी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते. या संकल्पनेपासून प्रेरणा घेऊन हा ‘चॅटबॉट’ विकसित करण्यात आला आहे. आपले आवडते दिवंगत कलाकार, गायक किंवा नातलगांशी संभाषण करण्याची इच्छा असेल तर ती चॅटबॉटद्वारे सैद्धांतिक आधाराने शक्य होऊ शकेल. या तंत्रज्ञानाच्या पेटंट दस्तावेजानुसार ज्या दिवंगत व्यक्‍तीशी तुम्हाला बोलायचे असेल किंवा त्याचा सल्‍ला घ्यायचा असेल त्याच्याशी संबंधित सर्व सोशल डेटा म्हणजे छायाचित्रे, सोशल मीडिया पोस्ट, मेसेजेस, व्हॉईस डेटा किंवा त्यांनी लिहिलेली पत्रे याद्वारे चॅटबॉट त्यांचे व्यक्‍तिमत्त्व स्वीकारेल आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देईल. यामधून तुम्हाला आपण जणू काही संबंधित मृत व्यक्‍तीशीच बोलत असल्याचा भास होईल. चॅटबॉटची भाषाशैली, आवाजातील चढ-उतार आणि संवेदनाही संबंधित व्यक्‍तीसारख्या असतील. काही टूल्सचा वापर करून दिवंगत व्यक्‍तींचे 2-डी किंवा 3-डी इमेजसह फेशियल रेकग्‍निशन अल्गॉरिदमचा वापर करून जिवंत चित्रही बनवता येते. यामधून या व्यक्‍तीशी थेट संवाद साधल्याची जाणीव निर्माण होईल.

Back to top button