क्‍वारंटाईनच्या काळात लिफाफ्यांपासून बनवला डायनासोर! | पुढारी

क्‍वारंटाईनच्या काळात लिफाफ्यांपासून बनवला डायनासोर!

सिडनी : लॉकडाऊनच्या काळात किंवा चौदा दिवस घरीच क्‍वारंटाईन असताना वेळ कसा घालवायचा हा प्रश्‍न अनेकांना पडतो. या वेळेचा सदुपयोग करणारेही अनेक लोक आहेत. आता ऑस्ट्रेलियात पर्थमधील एका हॉटेलमध्ये चौदा दिवसांसाठी क्‍वारंटाईन झालेल्या कुटुंबाने या काळात टाकाऊ लिफाफ्यांचा वापर करून डायनासोरची सुंदर प्रतिकृती निर्माण केली. हा डायनासोर आता हॉटेलची शोभा वाढवत आहे.

सॅम, त्यांची पत्नी कार्ली कॅटेलानो आणि या जोडप्याची तीन वर्षांची कन्या फ्लोरेन्स हे ब्रिटनमधून ऑस्ट्रेलियात आले होते. त्यांना या हॉटेलमध्ये चौदा दिवसांसाठी क्‍वारंटाईन करण्यात आले. या काळात वेळ कसा घालवायचा हा प्रश्‍न त्यांना पडला. आपल्या खोडकर मुलीला व्यस्त ठेवण्याचेही आव्हान या दाम्पत्यासमोर होते. त्यावेळी त्यांना एक कल्पना सूचली. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी वापरले जाणारे अनेक लिफाफे बेकार पडलेले त्यांना दिसून आले. त्यांनी हे लिफाफे तसेच टेकआऊट बॅग, कंटेनर, काही डिस्पोजेबल कटलरी, एक लोखंडी बोर्ड आणि अन्य काही टाकाऊ वस्तूंचा वापर करून डायनासोरची प्रतिकृती बनवण्यास सुरुवात केली. त्यांनी बॅगासॉरस या प्रजातीच्या डायनासोरची दीड मीटर म्हणजेच सुमारे पाच फूट लांबीची ही प्रतिकृती तयार केली.

 

Back to top button