‘ऑटोपायलट मोड’वर कार; चालक बसला मागील सीटवर! | पुढारी

‘ऑटोपायलट मोड’वर कार; चालक बसला मागील सीटवर!

न्यूयॉर्क : आपल्या श्रीमंतीचे नको तिथे ओंगळवाणे प्रदर्शन करणारे अनेक हौसेनवशे असतात. भारतीय वंशाच्या अशाच एका अमेरिकन नागरिकास ‘टेस्ला’ची ऑटोपायलट मोडवर ठेवलेली कार फिरवून आपल्या विलासी जीवनाचे प्रदर्शन करीत असताना पोलिसांनी अटक केली आहे. या कारमध्ये तो चक्क मागील सीटवर बसला होता.

कॅलिफोर्नियामधील परम शर्मा नावाच्या या 25 वर्षांच्या तरुणास कॅलिफोर्निया हायवे पॅट्रोलच्या पोलिसांनी अटक केली. पुढील तपासणीसाठी त्याची टेस्ला कारही ताब्यात घेण्यात आली. हा तरुण पोलिसांना कारच्या मागील सीटवर बसून हसत असताना आढळून आला होता. ‘मॉडेल 3’ ही गाडी तो चालवत होता आणि ड्रायव्हर सीटवर कुणीच नव्हते. टेस्लाच्या कारमध्ये जरी ‘ऑटोपायलट’चे फीचर देण्यात आले असले तरी ते पूर्णपणे सुरक्षित नाही आणि त्यामुळेच कार ऑटोपायलटवर ठेवली तरी चालकाच्या सीटवर कुणी तरी बसून लक्ष ठेवणे व गाडी गरजेच्या वेळी नियंत्रित करणे अपेक्षित असते. कंपनीनेही ऑटोपायलट फीचर वापरत असताना ही गरजेची बाब असल्याचे आपल्या वेबसाईटवर स्पष्ट केलेले आहे. मात्र, हा अतिउत्साही तरुण कार ऑटोपायलट मोडवर ठेवून निवांत मागील सीटवर बसला होता. काच निम्मी खाली केलेल्या खिडकीतून तो कॅमेर्‍याकडे पाहून दातही काढत होता. कॅलिफोर्निया हायवे पॅट्रोलच्या गोल्डन गेट डिव्हिजनमधील पोलिसांनी त्याला कॅमेर्‍यात टिपलेच, शिवाय अटक करून कारही ओढून नेली!

Back to top button