…म्हणून ‘त्याने’ सलग 365 दिवस पाण्यात घेतली उडी! | पुढारी

...म्हणून ‘त्याने’ सलग 365 दिवस पाण्यात घेतली उडी!

वॉशिंग्टन ः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मनसोक्‍त पोहण्यासाठी अनेकजण पाण्यात सूर मारत असतात. मात्र, वर्षातील 365 दिवस कुणी पाण्यात उडी मारत असेल, असे आपल्याला वाटणार नाही. अमेरिकेतील डॅन ओकोनोर नावाचा माणूस असा सलग 365 दिवस पाण्यात उडी मारत राहिला. याचे कारण म्हणजे पाण्यात त्याला एकांत लाभत होता!

शिकागोमध्ये राहणारा हा तरुण रोज मिशिगन तलावात उडी मारत होता. 12 जून 2021 ला त्याच्या या उपक्रमास 365 दिवस पूर्ण झाले. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात तणावमुक्‍त राहण्यासाठी त्याने हा मार्ग पत्करला होता. सध्याच्या काळात महामारीच्या व तत्संबंधी अनेक समस्यांच्या कारणामुळे अनेक लोक तणावग्रस्त बनत आहेत. त्यामधून बाहेर येण्यासाठी ज्याचा त्याचा स्वतःचा मार्गही असू शकतो. डॅनला हा मार्ग तलावात उडी मारून काही वेळ पोहण्यात सापडला होता. त्याने सांगितले, पाण्यात उडी मारल्यानंतर मला वाटतं की, माझ्यापर्यंत कुणाचाच आवाज पोहोचू शकत नाही. तिथे मी फक्‍त स्वतःसोबतच असतो व जणू काही ध्यानाच्या स्थितीत जातो. हिवाळ्यात तलावाचे पाणी गोठलेले असतानाही डॅनने आपला दिनक्रम सोडला नाही. त्याने या बर्फाच्छादित पाण्यातील बर्फाचा स्तर फोडून स्वतःला उडी मारण्याइतकी जागा निर्माण करण्यास सुरुवात केली. तिथे उडी मारत असताना अनेकवेळा त्याला बर्फाच्या थरामुळे जखमाही होत होत्या; पण त्याने आपला हा नेम सोडला नाही!

Back to top button