आता अंतराळ स्थानकातही धुता येतील कपडे! | पुढारी

आता अंतराळ स्थानकातही धुता येतील कपडे!

वॉशिंग्टन : पृथ्वीच्या कक्षेत फिरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक अंतराळवीर काही काळासाठी टप्प्याटप्प्याने राहून वैज्ञानिक प्रयोग करीत असतात. आता तिथे राहणार्‍या अंतराळवीरांसाठी ‘नासा’ने खास डिटर्जेंट पाठवण्याची तयारी केली आहे. त्याच्या सहाय्याने अंतराळ स्थानकावरही ‘लाँड्री’ तयार होऊन कपडे धुता येतील!

अंतराळ स्थानकात राहणे हे पृथ्वीवरील दैनंदिन जीवनापेक्षा बरेच वेगळे असते. शून्य गुरुत्वाकर्षणाच्या स्थितीत तिथे राहणार्‍या अंतराळवीरांसमोर अनेक आव्हाने असतात. त्यामुळे खाण्या-पिण्यापासून झोपण्यापर्यंत अनेक बाबतीत विशेष गोष्टी असतात. कपडे धुण्यासाठी पाण्याची गरज सर्वप्रथम असते. स्पेस स्टेशनवर पाणी मर्यादित प्रमाणात असते आणि त्यामुळे अंतराळवीरांना अनेक अडचणी येऊ शकतात. लाँड्रीची सुविधा नसल्याने अंतराळवीर वापरलेले कपडे तिथेच फेकून देतात. त्यामुळे ‘नासा’ दरवर्षी स्टेशनवर प्रत्येक सदस्यासाठी 72 किलो कपडे पाठवत असते. अशावेळी स्टेशनवर कपडे धुण्यासाठीचा स्थायी उपाय शोधणे गरजेचे होते. त्यासाठी ‘नासा’ने आता एका कंपनीच्या सहकार्याने खास डिझाईन केलेल्या डिटर्जंटचा वापर करून त्याबाबतचे प्रयोग करणार आहे. त्यामधूनच अंतराळातील लाँड्री विकसित करण्यासाठीची रचना स्पष्ट होईल.

 

Back to top button