एक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित! | पुढारी

एक घास ३२ वेळा चावून खाण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित!

टोकियो : ‘एक घास 32 वेळा चावून खावा’ असे आपल्याकडे लहानपणीच सांगितले जात असते. त्याचे महत्त्व आता पुन्हा एकदा एका नव्या संशोधनाने अधोरेखित केले आहे. एका जपानी विद्यापीठाने नुकत्याच केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की अन्न चावून-चावून खाणे आणि डीआयटी (डाएट-इन्ड्रु्यूस्ड थर्मोजेनेसिस) यांचा एकमेकांशी संबंध आहे. वासेदा विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या या संशोधनातून असा निष्कर्ष समोर आला आहे की अन्न योग्यप्रकारे चावून खाल्ल्यास शरीर निरोगी राहते. तसेच हळूहळू आणि योग्य प्रकारे अन्न चावून खाल्ल्याने लठ्ठपणा आणि वजन वाढण्याची समस्या रोखण्यास मदत होते.

खरे तर हे तथ्य मागील शतकातच लोकप्रिय झालेले आहे आणि त्यावेळेपासूनच अनेक अभ्यासांमध्ये त्याची पुष्टीही झालेली आहे. वासेदा विद्यापीठाच्या डॉ. युका हमादा आणि प्रा. नाओयुकी हयाशी यांच्या नेतृत्वाखाली याबाबत नवे संशोधन करण्यात आले. त्याचे निष्कर्ष ‘सायंटिफिक रिपोर्टस्’मध्ये प्रकाशित झाले आहेत. चावून-चावून खाल्ल्यामुळे चयापचयाशी संबंधित ऊर्जा खर्च होते आणि आतड्यांची क्रिया वाढते, असे दिसून आले. खाल्ल्यानंतर शरीरातील उष्णता वाढते ज्याला आहार-प्रेरित थर्मोजेनेसिस (डाएट-इन्ड्रु्यस्ड थर्मोजेनेसिस) असे म्हणतात. ‘डीआयटी’ हे वजन वाढण्यापासून रोखण्यासाठी ओळखला जाणारा एक घटक आहे. याआधी डॉ. हमादा आणि प्रा. हयाशी यांच्या टीमला असे आढळून आले होते की हळूहळू आणि नीट चावून खाण्यामुळे केवळ डीआयटीच वाढत नाही तर आतड्यातील रक्तसंचारही वाढतो.

Back to top button