सोलापूर शहरात ३०० लिटर हातभट्टीदारूसह ३५० लिटर फ्रूट बियर जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

सोलापूर शहरात ३०० लिटर हातभट्टीदारूसह ३५० लिटर फ्रूट बियर जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Published on
Updated on

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा: राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि.५) जिल्ह्यात राबविलेल्या मोहिमेत एकूण १२ गुन्हे नोंद केले आहेत. या मोहिमेत विभागाने ४०५ लिटर हातभट्टी दारू, १६ लिटर देशी दारू, ३ लिटर विदेशी दारू, ३० लिटर ताडी व ३५० लिटर फ्रूट बियरसह एक लाख ७१ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केली.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अवैध दारूविक्री विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिनांक ४ जुलैपासून मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी जिल्हाभरात सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. यामध्ये विविध ६ पथकांकडून  कारवाई करण्यात आली.

सात रस्ता ते एम्प्लॉयमेंट चौक रोडवर मोटरसायकलवर संशयित दोन रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांना पाहताच मोटरसायकल जागेवरच सोडून तो फरार झाला. १४० लिटर हातभट्टीसह एकूण ७७,२०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पसार झालेल्‍य आरोपीचा शोध सुरू आहे.

गोंधळे वस्ती ते गांधी रोड, अक्कलकोट रोडवर मोटरसायकलवर ८० लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमध्ये हातभट्टी दारूची वाहतूक करताना दिसल्या. आरोपी मोटरसायकल टाकून पळून गेला असून, त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत ५८ हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

आशा नगर एमआयडीसी रोड येथील एका राहत्या घरामध्ये छापा टाकत, त्या ठिकाणी राजू कोंकोंडा याच्या राहत्या घरातून ६५० मिली क्षमतेच्या फ्रूट बियरच्या ५४० बाटल्या जप्त करण्यात आल्या. याची अंदाजे किंमत १६,२०० इतकी आहे. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.  पालखी मार्गावरील तैनात पथकांनी मौजे वेळापूर या ठिकाणच्या हॉटेल गणेश या धाब्यावर धाड टाकली. त्याठिकाणी जितेंद्र मधुकर गंभीरे याच्या ताब्यातून १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या २५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. वेळापूर एसटी स्टँड पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये आरिफ वजीर पठाण हा इसम देशी दारूची अवैध विक्री करताना आढळून आल्याने त्याच्या ताब्यातून १८० मिली क्षमतेच्या ३५ बाटल्या व ३५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.  दोन्ही कारवाईत रुपये ६,३२० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पंढरपूर शहरामधील हनुमान नगर येथे शंकर महादेव हेगडे याच्या ताब्यातून २० लिटर ताडी जप्त केली असून, पंढरपूर शहरामधील संत पेठ भागात बडवेचर झोपडपट्टीमध्ये एका पत्राचे शेडमधून सुभाष वाघमारे याच्या ताब्यातून २५ लिटर हातभट्टी जप्त केली आहे. तसेच मौजे वाखरी गावाच्या हद्दीत अमोल प्रल्हाद गुजर याच्या राहत्या घरातून पंधरा लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. तिन्ही गुन्ह्यात २५४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

पाचफुलेवाडी ( ता.माढा ) येथे माधव पंढरी पाचफुले याच्या राहत्या घरातून १८० मिली क्षमतेच्या देशी दारूच्या तीस बाटल्या व विदेशी दारूच्या १८० मिली क्षमतेच्या १६ बाटल्या असा एकूण ४८१० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आषाढी वारी निमित्त अवैध दारू विक्री, वाहतूक व निर्मिती तसेच हातभट्टी दारू विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. वैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूक होत असल्यास त्याची माहिती द्यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news