Eknath Shinde Tweet : शरद पवारांची भेट घेतली? 'त्या' फोटोवर मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा  | पुढारी

Eknath Shinde Tweet : शरद पवारांची भेट घेतली? 'त्या' फोटोवर मुख्यमंत्र्यांनी केला खुलासा 

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले दोन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट (Eknath Shinde Tweet) करत खुलासा केला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला नाट्यमयरीत्या वळण मिळाले. या दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतं ट्विस्ट येईल आणि काय कलाटणी मिळेल यावर तर्क-वितर्क केले जात होते. या घडामाेडींमागील सूत्रधार कोण? यावर अंदाज व्यक्त केले जात होते. अखेर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्‍यात  शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले.

एकनाथ शिंदे यांनी बंडापासून ते मुख्यमंत्री झाल्यानंतरचे त्यांचे बरेच फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या दोन दिवसातही त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसत आहेत. ही सदिच्छा भेट शऱद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी झाल्याची चर्चा होती. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चर्चेला उधाण आलं. आता आणखी कोणतं ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणात येणार यावर तर्क-वितर्क केले जावू लागले; पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ट्विटनंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Eknath Shinde Tweet – अफवांवर विश्वास ठेवू नये 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. शरद पवार साहेब यांच्या सोबतचा एक फोटो सध्या व्हायरल केला जात आहे. अशाप्रकारची कोणतीही भेट झालेली नाही. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये”.

काय आहे फोटोमागील सत्य? 

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे की,  “मी शरद पवारांची भेट घेतलेली नाही; पण हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे.

एकनाथ शिंदे आणि शरद पवारांचा हा फोटो ११ नोव्हेंबर २०२१ राेजीचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केला आहे. ट्विटमध्ये नमूद केले आहे की, राज्याचे नगर विकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी आज आदरणीय खा. शरद पवार साहेबांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या ट्विटमध्ये शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांना टॅग केले आहे. यामुळे पवार आणि शिंदे यांचा जुन्‍या भेटीचा फाेटाे साेशल मीडियावर व्‍हायरल हाेत असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button