

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : चुनाभट्टीच्या नागोबा चौक डोंगर भागातील चार घरांवर दरडी कोसळण्याची घटना बुधवारी सकाळी घडली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी चेंबूर अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत दोघांना सुखरूप बाहेर काढले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागोबा चौक परिसरातील डोंगरात झोपडपट्टी भाग असून पावसाळ्यात २५ ते ३० कुटुंब जीव मुठीत घेऊन राहतात. बुधवारी सकाळी डोंगरातील दरड चार घरांवर कोसळल्या. त्यावेळी मोठा आवाज आल्याने घरातील बहुतेकजण बाहेर येऊन सुरक्षितस्थळी उभे राहिले. त्यामुळे मोठी जीवितहानी टाळली. शिवम सोनवणे व प्रकाश सोनवणे यांच्यावर सध्या सायन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.