सोलापूर : झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास | पुढारी

सोलापूर : झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  अक्‍कलकोट तालुक्यातील आंदेवाडी येथे घरात झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्याने जबरदस्तीने चोरून नेले. याबाबत मुन्नाबी रसूल नदाफ (वय 35) या महिलेच्या फिर्यादीवरून अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास मुन्नाबी नदाफ या त्यांच्या घरामध्ये तीन मुलींसह घराचा दरवाजा पुढे करुन झोपल्या होत्या. पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून मुन्नाबी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व घराबाहेर छपराखाली झोपलेल्या त्यांच्या पतीचा मोबाईल चोरून नेला. मुन्नाबी यांनी आरडाओरड केल्यानंतर त्या चोरट्याचा पाठलाग केल्यानंतर काही अंतरावर असलेल्या दुचाकीवरील आपल्या साथीदाराच्या मदतीने तो दुचाकीवरून पळून गेला. याची नोंद अक्‍कलकोट दक्षिण
पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

पोलिस निरीक्षक काळे पुढील तपास करीत आहेत. अक्‍कलकोट तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे. याबाबत पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

Back to top button