T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पंड्या उपकर्णधार, सॅमसन-दुबेला संधी | पुढारी

T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा! हार्दिक पंड्या उपकर्णधार, सॅमसन-दुबेला संधी

पुढारी ऑनलाईन डेस्क : T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने मंगळवारी (30 एप्रिल) अहमदाबादमध्ये बोर्डाचे सचिव जय शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर संघ जाहीर केला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात केएल राहुलसह इशान किशनला संधी मिळालेली नाही. यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंतचे पुनरागमन झाले आहे. तर संजू सॅमसनला पर्यायी यष्टीरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले आहे. हार्दिक पंड्याकडे उप कर्णधार म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

15 पैकी 4 अष्टपैलू

टीम इंडियाच्या 15 जणांच्या स्कॉडमध्ये 4 फलंदाज, 2 यष्टिरक्षक, 2 मध्यम गोलंदाज अष्टपैलू, 2 फिरकी गोलंदाज अष्टपैलू, 2 फिरकीपटू आणि 3 वेगवान गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि अष्टपैलू शिवम दुबे यांच्यावरही विश्वास दाखवला आहे. मात्र, शुभमन गिल आणि रिंकू सिंह यांना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवले आहे. संघातही मोहम्मद सिराजला आपले स्थान निश्चित करण्यात यश आले आहे. किंबहुना अनेक माजी दिग्गजांनी सिराजच्या नावावर फुली मारली होती. मात्र बीसीसीआयने सिराजचा संघात समावेश केला आहे. हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा संघात अष्टपैलू म्हणून समावेश करण्यात आला आहे. वेगवान मा-याची जबाबदारी अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि सिराज यांना सांभाळायची आहे.

टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शिवम दुब, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

स्पर्धेसाठी संघासोबत प्रवास करणारे राखीव खेळाडू :

शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान

टीम इंडियाचा पहिला सामना 5 जूनला

टीम इंडिया 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. दुसरा सामना 9 जून रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. तिसरा सामना 12 जून रोजी यजमान यूएसए आणि चौथा सामना 15 जून रोजी कॅनडा विरुद्ध खेळला जाईल.

स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी गयाना येथे खेळवला जाईल. दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी त्रिनिदाद येथे होईल. त्याचप्रमाणे 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये विजेतेपदाचा सामना रंगणार आहे.

कॅप्टन म्हणून हिटमॅनचा तिसरा वर्ल्डकप

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये तिसरा विश्वचषक खेळणार आहे. यापूर्वी 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकात हिटमॅन भारतीय संघाचा कर्णधार होता. त्या स्पर्धे संघाने उपांत्य फेरी गाठली होती. तर गेल्या वर्षी म्हणजे 2023 च्या वनडे विश्वचषक स्पर्धेतही रोहितच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. त्या स्पर्धेत टीम इंडियाने राउंड रॉबिन फेरीतील 10 पैकी 10 सामने जिंकले होते. मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला.

Back to top button