सांगली : श्री बिसलसिध्देश्वर देवस्थान परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला | पुढारी

सांगली : श्री बिसलसिध्देश्वर देवस्थान परिसर भाविकांच्या गर्दीने फुलला

जत ; विजय रुपनूर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर सिद्धपुरुष महान तपस्वी श्री बिसलसिध्देश्वर देवस्थान आहे. हे देवस्थान अचकनहळ्ळी (ता.जत) हद्दीत व जत-येळवी राज्य मार्गालगत आहे. श्रींचे हे जुने मंदिर असून, मंदिरात श्रींची पिंड आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात देवाच्या मुखवट्याला आकर्षक फुलांनी सजवण्यात येते. श्रींची मूर्ती पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. गाभार्‍या समोर श्री सिध्देश्वर, नंदी व नंदीच्या समोर श्री सिध्देश्वर डिकमळ भविकांचे लक्ष वेधून घेते. या मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर मंदिरासमोर स्नानकुंडही पाहावयास मिळते. या ठिकाणी श्रावण महिन्यात दर सोमवारी देवालयाचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून जातो.

गेल्या चार वर्षात मंदिर व मंदिर परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यात आल्‍या आहे. भक्तनिवास, मंदिर परिसरातील रस्ते, दिवाबत्तीची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, शिस्तबद्ध दर्शनासाठी रांगा, सर्व परिसर सीसीटीव्ही कॅमेराबद्ध, परिसरात वृक्ष लागवड अशा विविध सोयी दिल्याने महाराष्ट्रसह कर्नाटकातील भाविकांचा ओघ वाढू लागला आहे.

मंदिरात श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते. कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भक्तगणांच्या गर्दीने हा परिसर फुललेला दिसून येतो. सदरचे मंदिर ९०० वर्षांपूर्वीचे आहे. या बांधकामातून रेखीव व बांधीव कलाकृतीचे दर्शन होते. मुख्य मंदिर व मंदिराच्या चहुबाजुंनी तटबंदीचे उंच असलेले बांधकाम, मंदिरात जाण्यासाठी एकच मुख्य दरवाजा हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे.

या देवालायातील महान तपस्वी श्री बिसलसिध्देश्वर यांची अख्यायिका आहे की, मिरवाड गावांचे प्रमुख नंदेप्पागौडा यांचा मुलगा महालिंग हा वयाच्या बाराव्या वर्षी कुष्टरोगाच्या आजाराने ग्रासला होता. एका स्वामी (जंगम) च्या उपदेशाने कल्याणपट्टण शहरात सिध्दपुरुष म्हणजेच महान तपस्वी श्री सिध्देश्वर यांच्याकडे गेल्यास आपली व्याधी नष्ट होईल. यानुसार महालिंगाचे सर्व आजार नष्ट झाला. ते शिष्य म्हणून १२ वर्षे या स्वामीजींची सेवा केली असता, श्री सिध्देश्वरांनी आपले शिष्य महालिंग यांची कठोर परिक्षा घेतली. त्यात पात्र ठरल्याने महालिंगास आपल्या मिरवाड या गावी जाण्यास सांगितले.

मात्र तो तयार होत नव्हता. त्यास सिध्देश्वरांनी मी तुझ्या मातेस तुझी व्याधी बरी झाल्यानंतर पाठवितो असे सांगितले असून, आपली सेवा येथून ये -जा करुन करण्यास सांगितले त्यावर महालिंग तयार झाले. आपल्या इच्छे प्रमाणे परमशिष्य महालिंगने रोज मिरवाडहून कल्याणपर्यंत मनोभावे दही, दूध, तूप, अग्निकुंण्डात घालत असे. या अपार भक्तीसागराला सिध्देश्वर प्रसन्न झाले.

महालिंगाची परिक्षा घ्यावयाची असल्याने कल्याणहून ते उत्तरेकडे काशीला, दक्षिणेकडील काशीला म्हणजे रामेश्वर व तिथेही महालिंग शोधत आला. नंतर सिद्धपुरुष बिसलसिद्धेश्वरने सोलापूर व नंतर अच्यूतपूर (अचकनहळळी) येथे जाण्याचे ठरले. त्यानुसार प्रत्येक परिक्षेत महालिंग यशस्वी झाला.

काराजनगी (ता.जत) गावात आजही दूध न विकणारे गाव

श्री बिसलसिद्धेश्वर हे सिद्ध पुरुष सोलापूरहून शिष्य महालिंगाच्या इच्छेनुसार जत तालुक्यातील मिरवाड येथे जाण्याकरिता निघाले. दरम्यान श्री बिसलसिध्देश्वर हे काराजनगी येथे शिष्य रेवाण्णा यांची भेट घेतली व गावाजवळ जुने शिवमंदिर होते. या ठिकाणी योगपुरूष स्थिरावले. या ठिकाणी काही वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले व त्यांना उपदेश केला. या ठिकाणी निसर्गाचे व जगाचे शुध्दीकरण म्हणून अग्निकुंण्ड निर्माण केला. या ठिकाणी यात दही, दूध, तूप, लोणी टाकत असे. यामुळे वातावरण शुध्द होते. यावेळी स्वामीजी चिंतन करत असतं. या अग्निकुंडास काराजनगी येथील मलकनगौडा यांच्या घरातून दही, दूध, तूप अर्पण केले जात असे. हे आपल्या घरातून एकच दिवस या वस्तू श्री बिसलसिध्देश्वर च्या अग्निकुण्डास अर्पण केले होते. ही माहिती मलकनगौडाची मोठी मुलगी भागीरथीला माहित होते. परंतु हा दिनक्रम असल्याचे लक्षात येताच भागीरथीने विरोध केला. श्री बिसल सिद्धेश्वर स्वामीजींना तिने शिव्या शाप दिले. ही गोष्ट त्रिकालज्ञानी योगेश्वरांना कळाल्यानंतर ते मिरवाडच्या दिशेने वाट चालू लागले.

वाटेतच जत शहरात मडकी विकण्यास गेलेला कुंभार शरणय्या भेटला. त्यास श्री बिसलसिध्देश्वरांनी त्याच्याजवळ मलकनगौडास निरोप दिला. या गावातील दूध, दही, तूप, लोणी कोणालाही विकू नये. जर विकले तर त्या व्यक्तीस समाधान लाभणार नाही. त्यामुळे आजही या काराजनगी गावात हे पदार्थ विकले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी गावात दूध व्यवसाय करण्यास सुरुवात केली, परंतु हा फार काळ टिकला नाही. त्यामुळे या गावात आजही या प्रथेला अधिकाधिक महत्त्व दिले जात आहे.

श्री बिसलसिध्देश्वराचे समाधीस्थान

अच्युतपूर (अचकनहळ्ळी) येथे रेवडी च्या झाडाखाली विश्रांती घेत त्या ठिकाणी असणार्‍या गुरे राखणार्‍या पोरास गहू पिके रोग पडल्याने खराब झाले होते.  त्यातच जनावरे सोडली होती. त्याच गहूपासून गव्हाची मोठी रास करुन दाखविली. आपले शिष्य रेवाण्णास सांगितले की आजपर्यंत मी जनसेवा करुन समाधान मिळवले आहे. मी यापूढे जनसमूहाच्या पूढे जाणार नाही, असे सांगून त्यांनी तळहातावर इष्टलिंग धरुन बसले. त्यांच्यावर त्यांची दृष्टी स्थिर झाली व त्‍यांनी आपला देह शिवलिंगाला अर्पण केला. शिष्य रेवाण्णांनी आपला देह गुरूचरणावर वहिला. ही गोष्ट महालिंगास समाजताच जागेवरच कोसळले. महालिंगचा आत्मा लिंगदेवाबरोबर एकरुप झाला. तो योगी बिसलसिध्देश्वराच्या सन्निध्याची अपेक्षा पूर्ण झाली होती.

याच ठिकाणी हे आजचे श्री बिसलसिध्देश्वर मंदिर आहे. ही कथा सुमारे नऊशे वर्षीपूर्वीची आहे.

जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर देवस्थान श्री बिसलसिध्देश्वराच्या भक्तांची संख्या मोठी आहे. दररोज या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी असते.आज या ठिकाणी देवस्थान समितीचे अध्यक्ष समाधान शिंदे यांच्या प्रयत्नातून व लोकवर्गणीतून, आमदारांचा स्थानिक विकास निधी यातून मंदिर परिसरातील अनेक विकास कामे हाती घेतली आहेत. भक्त निवासाचे बांधकाम पूर्ण केले आहे. परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. स्वागत कमानही उभा केली आहे. हे देवस्थान जत शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. भक्तांसाठी बसेस व खासगी वाहने मिळतात.

हेही वाचा : 

Back to top button