Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री | पुढारी

Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक (ओझर) : मनोज कावळे
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत अवैध दारू, बंदी असलेला गुटखा याचे उच्चाटन करीत आहेत.

मागील काही महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी क्शन मोडवर येत गुटखाविक्रीला मोठा चाप लावल्याने अखंड 14-15 तालुक्यांत जरब बसलेली आहे. परंतु आजही चोरी-छुपी मार्गाने काही प्रमाणत गुटखा तस्करी सुरू असल्याने नाशिक शहरात मात्र याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच नाशिक शहरात दाखल होणारा गुटखा हा परराज्यातून येत असल्याने व जिल्हा हद्द ही ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येत असल्याने या मालाला तटबंदी नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांनी अनेक वर्षांनी अवैध धंद्यांना जरब बसवली खरी. परंतु गुटखा हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून, त्यावर अचूक नेम धरत तमाम ठाणेप्रमुखांना तो मिटवण्याचे कडक आदेश होते. सर्व निरीक्षकांनी आदेशाला जी हुजूर म्हणत मैदानात उतरत कारवाई केल्याने ग्रामीण भागांतील टपर्‍यांवर लाल पिचकार्‍या केवळ पानाच्या दिसू लागल्या आहेत. प्रत्येक विक्रेत्याची हजेरी सुरू झाल्यामुळे कमालीची धास्ती मनात धरत दोन पैसे कमी पण डोक्याला ताण नको म्हणत विक्रेत्यांनीही या मोहिमेचा भाग बनण्याचे ठरवून टाकल्याचे दिसते. मूळ प्रश्न हा आहे की, नाशिक शहर हे मध्यभागी असताना त्याला चारही बाजूंनी ग्रामीणचे कवच आहे. अशात ज्या बड्या कारखानदारांकडून हा माल बनवून पुरवला जातो, ते महाराष्ट्राबाहेरील आहे. नाशिक शहराला बाह्य राज्यातून जोडणारे रस्ते हे ग्रामीण हद्दीतून जात असताना त्यावर कधी अंकुश येणार, हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलाय.

खरे तर मध्य प्रदेश आणि गुजरात हे राज्य गुटखा कारखानदारीचे माहेरघर संबोधले जात असताना, नाशकात भर रस्त्यात दिसणार्‍या पुड्या नेमक्या कुठून आणि कशा येतात, हा खरा प्रश्न आहे. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून अन्न औषध प्रशासन काम करत असताना शहरात शिरणार्‍या गुटखा वाहतूक करणार्‍या गाड्या त्यांना चकवा देत असल्याने ग्रामीण आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. एकूणच गुटखा हा जीवघेणा असताना हजारो नागरिकांनी कारवाईचे कौतुक केले आहे. परंतु दररोज ग्रामीण पोलिसांच्या गुन्हेगारीत बहुतांश जागा गुटखा धाडीच्या दिसत असताना, त्याला ग्रामीण व्हाया मिळणारा वाव रोखण्याचे आव्हान यापुढे पोलिसांसमोर राहणार असल्याचे दिसते.

डिटेक्शनचे प्रमाण कमी
जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैध व्यावसायिकांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचे सर्वच स्तरातून स्वागत होत असताना जिल्ह्यातील चोर्‍यांचे प्रमाण, चेन स्नॅचिंगच्या प्रकारांत मात्र वाढ होताना दिसत आहे. अवैध धंद्यांवर कारवाईसाठी जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्थानिक गुन्हा अन्वेषणसह विशेष पथकांची निर्मिती केली. याच पथकांची कामगिरी चांगली असताना मात्र इतर गुन्हे उघडकीस आणण्यास अपयश येत असल्याची चर्चा आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने अवैध धंद्यांवर यशस्वी धाडसत्र करताना त्यांचे डिटेक्शनचे प्रमाण कमी होत असल्याचे समोर येत आहे.

Back to top button