नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच! | पुढारी

नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच!

नाशिक : दीपिका वाघ
येथे पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेसारखा अंतिम फेरीचा इव्हेंट पार पडला. स्पर्धेची सांगता मराठी बाणा, चंद्रपूर संस्थेच्या ‘वृंदावन’ नाटकाने सोमवारी (दि.२७) होत आहे. प्राथमिक स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये आलेल्या दर्जेदार नाटकांचा समावेश होता. महिनाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी मोफत, तर प्रेक्षकांना 15 रुपये तिकीटदर असूनही शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमींनी नाटकांकडे पाठच फिरवली. नाटकाला येणारा प्रेक्षक हा सामान्य प्रेक्षक व नाटक क्षेत्रातील विद्यार्थी वर्ग एवढाच होता.

दि. 1 मार्चला ‘निर्वासित’ नाटकाने स्पर्धेला प्रारंभ झाला पण स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी कलाकारांना रिकाम्या खुर्च्या बघाव्या लागल्या. या इव्हेंटला परीक्षक आणि काही मोजकीच डोकी उपस्थित होती. नाशिक शहराला नाट्यकर्मींची मोठी परंपरा असताना, अशी वेळ का यावी? शहरातील प्राथमिक फेरीत नाटकाचे सादरीकरण करणारे किती दिग्दर्शक, कलाकार, रंगकर्मी उपस्थित होते? असा प्रश्न उपस्थित होतो. स्पर्धेला कालिदास कलामंदिर, परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरुवात झाली पण स्पर्धेच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांचा प्रतिसाद जेमतेम मिळाला. स्पर्धेत एकूण 40 नाटके सादर होणार होती. त्यापैकी ‘फक्त एकदा वळून बघ’ नाटक रद्द झाले पैकी 39 नाटकांचे सादरीकरण झाले.

कोविडनंतर आता कुठे मराठी रंगभूमी सावरत आहे. आजचा प्रेक्षक बदलत आहे. नाटक, सिनेमांत केवळ चेहरा असून उपयोग नाही, तर कथा आणि सादरीकरण महत्त्वाचे झाले आहे. मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणारे संगीत ‘देवबाभळी’, ‘देवमाणूस’ ही नाटके बिनचेहर्‍याची असून सशक्त सादरीकरणामुळे प्रेक्षकांनी ती स्वीकारली. – जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यावसायिक.

कलाकारांना हवा असतो जिवंत प्रतिसाद
नाटक हा लाइव्ह इव्हेंट असतो. इथे कलाकारांना पैशांची नाही, तर प्रेक्षकांच्या जिवंत प्रोत्साहनाची गरज असते. रंगमंचावरील कलाकारांना ‘वा… वा’ अशी दाद दिली, तरी त्याचा अभिनय इतका खुलतो की, त्याला पुढील काम करताना पाठबळ मिळते. नाटकाला प्रेक्षकच नसला, तर रिकाम्या खुर्च्यांसमोर अभिनय करायचा का? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बाहेरगावाहून आलेल्या रंगकर्मींनी स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद दिला. नाटकाची वेळ कालिदास कलामंदिर दुपारी 4 आणि प. सा. नाट्यगृह रात्री 8 ची असल्याने दोन युनिट तयार केले होते. दोन नाटकांमधील अंतर कमी असल्याने रंगकर्मींची गैरसोय होऊ नये म्हणून समित्या नेमल्या होत्या. त्यामुळे नाटकांचे सर्व प्रयोग व्यवस्थित पार पडले. – राजेश जाधव, राज्य नाट्यस्पर्धेचे समन्वयक.

Back to top button