राज्यात दरवर्षी वाढतेय अंड्यांचे उत्पादन | पुढारी

राज्यात दरवर्षी वाढतेय अंड्यांचे उत्पादन

औरंगाबाद, राहुल जांगडे : मागील काही वर्षांपासून राज्यात अंड्यांचे उत्पादन सतत वाढत चालले आहे. अगदी कोरोना संकटातही भरघोस उत्पादन झाले असून, सरत्या आर्थिक वर्षी राज्यात विक्रमी 701 कोटी अंडी उत्पादन झाल्याची माहिती ‘पुढारी’शी बोलताना पशुसंवर्धन विभागातील वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. उत्पादनातील वाढ अशीच राहिल्यास लवकरच इतर राज्यांना अंडी पुरवठा करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.

राज्यात अंडी उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या असलेल्या विविध योजनांची पशुसंवर्धन विभागाकडून अमंलबजावणी केली जाते. शेतकर्‍यांना जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहित करणे, नवीन पोल्ट्रीसाठी सबसिडी, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 25 पिल्ले आणि काही आठवडे वाढवलेल्या 100 कोंबड्या शेतकर्‍यांना दिल्या जातात. यामुळे मागील काही वर्षांपासून राज्यात अंड्यांच्या उत्पादनात सातत्याने वाढ सुरू आहे.

अंडी उत्पादन वाढवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाची योजना

एक हजार कोंबडीचे शेड बांधण्यासाठी कर्जाच्या व्याजावर सबसिडी दिली जाते. 25 पिल्ले आणि काही आठवडे वाढवलेल्या 100 कोंबड्या शेतकर्‍यांना दिले जातात. या व्यतिरिक्त राज्यात अंडीचे उत्पादन वाढण्यासाठी पशुसंवर्धन विभाग प्रत्येक जिल्ह्याला 21 हजार रुपयांच्या अनुदानित दराने 50 व्हाईट लेघॉर्न कोंबड्या आणि 1 हजार पिंजरे देण्याच्या योजनेचा प्रस्ताव आखला आहे.

मंजुरीसाठी राज्य सरकारकडे राज्य शासनाकडे हा प्रस्ताव सादर केला असून, याद्वारे निश्चितच अंडी उत्पादनात वाढ होईल, असा विश्वास अधिकारी व्यक्त करीत आहेत. राज्यात दररोज 2.25 कोटी अंड्यांची मागणी आहे. दरवर्षी उत्पादन वाढूनही 1 कोटी अंडी कमी पडतात. त्यामुळे गरज भागविण्यासाठी तेलंगणा, कर्नाटक येथून अंडी मागविली जातात.

Back to top button