मुख्यमंत्र्यांचा फोन येताच कृषिमंत्री सत्तार नागपूरला | पुढारी

मुख्यमंत्र्यांचा फोन येताच कृषिमंत्री सत्तार नागपूरला

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर १९ गुंठे गायरान जमीन नियमबाह्यरीत्या एका नागरिकाच्या नावावर केल्याच्या प्रकरणावरून तत्कालीन महसूल राज्यमंत्री तथा विद्यमान कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सोमवारी (दि. २६) हा मुद्दा उपस्थित झाला अन् त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येताच सिल्लोडमधील कृषी महोत्सवाची बैठक आणि पत्रकार परिषद रद्द करून, सत्तार तातडीने नागपूरला रवाना झाले.

गायरान जमिनीच्या प्रकरणावरून सोमवारी हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुद्दा उपस्थित केला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना न्यायालयाच्या आदेशाविरोधात निर्णय घेऊन गायरान जमीन का नागरिकाला मंजूर केली. त्यांच्या या निर्णयावर नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढल्याचेही पवार म्हणाले. या प्रकरणावरून सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी सत्तार हे आपल्या मतदारसंघात १ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या तयारीत होते. दरम्यान, अधिवेशनातील या वादग्रस्त मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांनी सत्तार यांना फोनवर संपर्क साधला. काही वेळ चर्चा झाल्यानंतर लागलीच सत्तार यांनी कृषी महोत्सवाची बैठक रद्द केली. तसेच सुभेदारी विश्रामगृहात या महोत्सवाबाबत आयोजित केलेली पत्रकार परिषदही रद्द करून ते तातडीने नागपूरच्या दिशेने रवाना झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Back to top button